महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या महिलेस मारहाण करून अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिल्याची घटना ८ आॅगस्ट २०२१ रोजी घडली होती. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सुखदेव गुलाबराव माचेवाल-कुमावत (वय-४३, रा. कुमावतनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. सुशील ओमप्रकाश गौड (रा. भावीन बेला, शिंदेनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण भारती आनंद गौड या सुशील यांच्याकडे पाणी घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ओळखीतील आरोपी सुखदेव याने भारती यांना चापट मारली आणि खाली चल म्हणाला. भारती यांनी नकार दिला असता, सुखदेवने भारती यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यात भारती गंभीररित्या भाजल्या होत्या. तर त्यांना वाचविताना सुशील यांचे देखील हात-पाय भाजले होते. भारती यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसात आरोपी सुखदेव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी दोषी आढळून आल्याने, न्यायालयाने त्यास आजन्म कारावास व ६० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस. बी. चोपडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र साद केले. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पी. पी. घुले यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप appeared first on पुढारी.