मुंबई आग्रा महामार्ग ते धुळे कृषी महाविद्यालय रस्त्यातील अडथळे दूर, 20 कोटी उपलब्ध

रस्ता

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील देवपूर भागासह लाखो वाहन चालकांना दिलासा देणारा मुंबई आग्रा महामार्ग ते पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या 70 फुटी रस्त्याच्या कामावरील सर्व अडथळे दूर झाल्याची माहिती आज माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. या रस्त्यासाठी कृषी महाविद्यालयास जमीन देण्याचे आदेश देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका बैठकीत दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून प्रभात नगर ते रेल्वे स्टेशनचा रस्ता एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करणारच असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून 42 कोटी रुपये मंजूर झाले असून यातील वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.  मुंबई आग्रा महामार्ग ते पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंत हा 70 फुटी रस्ता केला जाणार आहे. या संदर्भातील माहिती आज पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत लोकसंग्रामचे तेजस गोटे, प्रशांत भदाणे, डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी गोटे यांनी सांगितले की, धुळे शहराच्या वाहतुकीची समस्या दिवसागणिक गंभीर स्वरूप धारण करीत आहे. रस्ता, पाणी, स्वच्छता, आरोग्य अशा नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र दिवसागणिक वाहनांची संख्या वाढतच असून रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद होत आहे. तर निकृष्ट रस्ते देखील समस्या उभी करीत आहेत. या समस्यामुळे शहरातील प्रत्येकाचे हाल होत असून महापालिका प्रशासनाकडून त्याला दिलासा दिला जात नसल्याने ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळेच या नवीन रस्त्याच्या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातील 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातूनच पांझरा नदीवरील पूर्ण उंचीचा पूल तसेच मुंबई आग्रा महामार्ग ते एकता नगर वड भिलाटी या मार्गाने पांझरा नदीवर येण्यासाठी नव्या पुलाची निर्मिती करून महापालिकेच्या कचरा डेपो मधून कृषी महाविद्यालयापर्यंतच्या नव्या रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन पर्यंत जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी कृषी खात्यातील जमिनीचे हस्तांतर होणे अशक्य झाले होते. या विषयाची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव पातळीवरील अधिकारी आणि विद्यापीठाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्री मुंढे यांनी रस्त्यासाठी लागणारे क्षेत्र कृषी महाविद्यालयाने तातडीने उपलब्ध करून द्यावे असे स्पष्ट आदेश दिले. या बदल्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला चैन लिंकिंगचे कंपाऊंड करून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना वापरा करिता एक भूमिगत रस्ता करून द्यावा, बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मंत्री मुंढे यांनी कृषी महाविद्यालयाला असे आदेश दिले. त्यामुळे शहराच्या विरुद्ध बाजूला असलेली व्यक्ती शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कुठलाही त्रास सहन न करता अडथळा न होता शहराच्या दुसऱ्या टोकाला 15 ते 20 मिनिटात पोहचू शकेल. रस्त्याच्या दर्जेदार निर्मितीमुळे शहरातील दुचाकी तसेच रिक्षाचालक यांना दिलासा देण्यासाठी 70 फुटी रस्त्याचे काम उभे राहणार आहे. धुळे शहराचा विस्तार हा चारही बाजूने वाढतो आहे .मात्र त्या तुलनेत नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याऐवजी महापालिका प्रशासन केवळ रस्त्यावर डांबर ओतण्याचे काम करीत आहे. परिणामी करोडो रुपये वाया जात आहेत. मात्र नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होत नाही. नवीन रस्ते तयार होत नाही, तोपर्यंत कोणताही उपयोग होणार नाही. रस्त्यावर डांबरी पट्टे मारून ठेकेदारांची बिले निघतील, मात्र समस्या सुटणार नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

धुळ्याची नेते उदासीन असल्याची टीका

धुळे शहराला वरदान ठरतील असे कुमार नगर ते मुंबई आग्रा महामार्गापर्यंत पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला आपण रस्ते तयार केले. मात्र या रस्त्यावर अडथळा ठरणारा जयहिंद तरण तलावाचा प्रश्न आता न्यायालयाने देखील निकाल देऊन देखिल  महानगरपालिकेने अतिक्रमण काढले नाही.  यासाठी महानगरपालिके प्रशासनाला अनेक स्मरणपत्र देऊन देखील हे अतिक्रमण काढले जात नाही. तर अनेक डीपी रस्ते देखील अशा अतिक्रमणामुळे बंद आहेत. हा गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यातील नेते विकासाबाबत उदासीन आहेत. धुळ्याच्या विकासासाठी वरदान ठरणारा मुंबई दिल्ली कॉरिडॉर हा प्रकल्प देखील आता रखडला आहे. या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये मनमाड इंदोर रेल्वे लाईन ही महत्त्वाची असल्याचे नमूद आहे. मात्र आता ही रेल्वे लाईन होणे शक्य नाही. नरडाणा ते बोरविहीर हा रेल्वे मार्ग मनमाड इंदोर चा भाग असूच शकत नाही. मूळ मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या प्रोजेक्टमध्ये चाळीसगाव हे गाव येत नाही. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग मनमाड, मालेगाव, धुळे ,शिरपूर ,धामणोद ,महू आणि इंदोर या दरम्यान होणार आहे. या मार्गात चाळीसगावचे नाव कुठेही येत नाही. त्यामुळे जनतेसमोर दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

The post मुंबई आग्रा महामार्ग ते धुळे कृषी महाविद्यालय रस्त्यातील अडथळे दूर, 20 कोटी उपलब्ध appeared first on पुढारी.