राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी मोठी आहे. आम्हाला विजयासाठी तेवढे पुरेसे आहे. आम्हाला राममंदिराचा वा धर्माचे राजकारण करण्याची गरजच नाही. आम्ही रामभक्त आहोत आणि राहणार. मात्र, धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या २२ जानेवारीचे अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण असतानादेखील तेथे जाण्यास नकार देत नाशिकमध्ये श्री काळारामाचे दर्शन घेत गोदाआरती करण्याचे जाहीर केले आहे. ठाकरेंवर कुरघोडी करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.९) ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत श्री काळाराम मंदिरात दर्शन घेत महाआरती केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपकडून राममंदिराच्या उद्घाटनाचे राजकारण केले जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा त्यांनी इन्कार केला.

ते म्हणाले की, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारे राजकारणावर बोलणार नाही. आम्ही रामभक्त आहोत. आमची श्रद्धा आहे. यापूर्वी मी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी गेलो होतो. आज आम्ही काळाराम मंदिरात पोहोचलो. महाराष्ट्राच्या कल्याणसाठी जे-जे करावे लागते ते काम आम्ही करीत आहेत, असे नमूद करत केंद्र व राज्यातील सरकारने केलेली कामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे बळ रामाकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले. काळाराम मंदिर हे पावनस्थळ असून, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजी यांचा इतिहास आहे. समाजाच्या कल्याणाकरिता जाती-पातीचे भेद मिटविण्याकरिता आमचा संघर्ष आहे. सेवा झाली पाहिजे या भावनेतून आम्ही काम करणारे लोक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी एवढी मोठी आहे की, धार्मिक विषयाचे राजकारण करून मते घेण्याची आम्हाला गरज नाही. देश कल्याण, राष्ट्र कल्याणाकरिता ज्या ज्या पद्धतीने जीवन समर्पित केलेले आहे, त्या योजना घरोघरी पोहोचविल्या तरी आम्हाला मताचे कर्ज घेण्यासाठी पुरेशा आहेत. अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्याविषयी जे जे राजकारण करतील त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो. आम्ही राष्ट्रहिताकरिता व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करणारे लोक आहोत, असा दावा केला.

हेही वाचा :

The post राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.