लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी

mpsc pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अराजपत्रित गट क संवर्गाच्या तब्बल साडेआठ हजार पदांसाठी जम्बो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये घेऊन यासाठी असलेली मुख्य परीक्षा विविध संवर्गानिहाय घेतल्या. १७ डिसेंबर रोजी लिपिक पदासाठी मुख्य परीक्षा झाली. दोन संवर्ग वगळता अद्याप इतर संवर्गासाठी निकाल जाहीर न झाल्याने तब्बल ८० हजार उमेदवार विवंचनेत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची शिफारस करत असते. त्यासाठी विविध संवर्गांसाठी पूर्व, मुख्य तसेच आ‌वश्यकता असेल तर मुलाखत किंवा तांत्रिक पडताळणी, असे टप्पे तयार केलेले आहेत. गेल्या वर्षी राज्य शासनाने सर्व विभागांमधील लिपिकांच्या रिक्त पदांचा मागणीपत्र पाठवून उमेदवारांची शिफारस देण्याची मागणी आयोगाकडे केली. आयोगाने तब्बल साडेआठ हजार जागांची भरतीप्रक्रिया राबवली. यासाठी पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी ३६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली. संवर्गनिहाय गट क मुख्य परीक्षेमध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक टंकलेखकसाठी १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली.

या परीक्षेला जवळपास ८० हजार उमेदवार बसलेले होते. परीक्षेला आता शंभरहून अधिक दिवस उलटूनही अद्याप दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक या संवर्गांचा निकाल वगळता कर सहायक आणि लिपिक टंकलेखक यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

गट क मुख्य परीक्षा 2023 होऊन 115 दिवस झालेले आहेत, मात्र, अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही. आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार दोन महिन्यांत निकाल येणे अपेक्षित होते. परंतु, आयोगाच्या कामकाजाचा कुठलाही ताळमेळ दिसून येत नाही. – आजम शेख, माहिती अधिकार.

हेही वाचा:

The post लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी appeared first on पुढारी.