वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचर तानाजी खकाळे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश वितरित केले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून परिचर तानाजी खकाळे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत्या. 16 डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे पशुधन पर्यवेक्षक यांची पशुवैद्यकीय दवाखाना सोडण्याची पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे दाखल होऊन त्यांनी वेतनवाढ काढत नाही, मी सगळ्यांकडे बघतो, एखाद्याला मारून टाकतो, माझे कोणी वाकडे करत नाही, मी स्थानिक आहे, अशी धमकी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यापूर्वी त्यांनी दोनदा कार्यालयात येऊन अर्वाच्च भाषेत मोठ्या आवाजात कर्मचारी, अधिकारी यांना अरेरावीपणा केला होता.

वारंवार समज देण्यात आली होती. त्यावर खकाळे यांचा अहवाल मागविला होता. यात त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, कार्यालयीन शांतता भंग करणे, कार्यालयात मद्यप्राशन करून जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांना शिवीगाळ करणे, यापूर्वी झालेल्या शिक्षेचा बोध न घेता वर्तनात सुधारणा न करणे, महिला कर्मचारी यांच्यासमोर महिलांना लज्जास्पद होईल, अशी शिवीगाळ करणे, शासकीय कामकाजात नियमबाह्य हस्तक्षेप, पशुधन पर्यवेक्षक यांची पशुवैद्यकीय दवाखाना सोडण्याची पूर्वपरवानगी न घेणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून त्यांच्या शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला. यावर खकाळे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा ;

The post वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित appeared first on पुढारी.