जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयांत स्थानिक स्तरावर औषधपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून अनियमित औषधपुरवठा होत असल्याचा ठपका ठेवत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून होत आहे. तसेच यावर पर्याय म्हणून नवीन वर्षापासून गव्हर्नर ई-मार्केट प्लेस (जेम) मार्फत औषध खरेदी करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाने रुग्णांना केसपेपरसह सर्व सुविधा मोफत केल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील यंत्रसामग्रीसह औषधसाठ्यावर प्रचंड ताण आला. पुरवठ्याच्या तुलनेने मागणीत वाढ झाल्याने रुग्णांना काही ठिकाणी औषध मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य शासनाने स्थानिक स्तरावर औषध खरेदीची मान्यता वाढवून देण्यात आली. दरम्यान, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासही एका औषध पुरवठादारामार्फत ४६ टक्के औषधपुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली. मात्र या औषध पुरवठादाराकडून अनियमित औषधांचा पुरवठा होत आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी चौकशी केली असता, औषध पुरवठादाराने त्याची लाखो रुपयांची थकीत रक्कम मिळत नसल्याने कारण सांगितले. या पुरवठादारास करारानुसार औषधपुरवठा थांबवता येत नसल्याची ताकीदही दिली. त्यामुळे त्याने औषध पुरविले मात्र ते अत्यल्प असल्याने रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डॉ. शिंदे यांनी या पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच औषधसाठा पूर्ववत करण्यासाठी जेम पोर्टलवरून औषध खरेदीचा निर्णय घेतला आहे.

‘जेम’कडून करणार खरेदी

राज्य शासनाने आरोग्य विभागांतर्गत हाफकिन कंपनीला औषधपुरवठ्याचा ठेका दिला आहे. मात्र थकबाकीचे कारण देत त्यांनी औषधपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर (लोकल) जिल्हा रुग्णालयांकडून औषध खरेदी केली जाते. मात्र त्यावर पर्याय म्हणून केंद्र शासनांतर्गत असलेल्या जेम पोर्टलवरून औषध खरेदीचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी घेतला आहे.

औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी पुरवठादाराकडून नियमित औषधपुरवठा होणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्याने संबंधितांवर कारवाई प्रस्तावित आहे. तसेच पर्याय म्हणून जेम पोर्टलवरून औषध खरेदी केली जाणार आहे. – डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक.

हेही वाचा :

The post जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता 'जेम'मार्फत appeared first on पुढारी.