विजय करंजकरांचा बंड आज होणार काय थंड?

विजय करंजकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वर्षभरापूर्वीच लोकसभा उमेदवारीचे संकेत मिळून देखील, ऐनवेळी पक्षाने उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात टाकल्याने दुखावलेले विजय करंजकर यांनी बंडाची भाषा बोलून दाखविली होती. करंजकर सोमवारी (दि.१) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेणार असून, भेटीनंतर त्यांचे बंड थंड होणार काय? याकडे शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षांचे लक्ष लागून आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराचे घोंगडे अद्यापही भिजत असून, महाविकास आघाडीने मात्र उमेदवार जाहीर करण्यात बाजी मारली आहे. प्रारंभी मविआचा उमेदवार विजय करंजकर असतील, असे चित्र होते. करंजकर यांना वर्षभरापूर्वीच उमेदवारीचे संकेत दिले गेल्याने, त्यांनी देखील आपली उमेदवारी गृहित धरून प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. मात्र, एेनवेळी उमेदवारीची माळ माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात टाकल्याने, विजय करंजकर दुखावले होते. त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत, ‘मी लढणार आणि पाडणार’ असा पवित्रा घेतला होता. मात्र, त्याचवेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केल्याने, त्यांचा बंड थंड होऊ शकतो, असा अंदाज उद्धव सेनेकडून वर्तविला जात आहे. दरम्यान, करंजकर यांना उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.१) मुंबई येथे बोलावले असून, त्यात ते आपली बाजू मांडणार आहेत. अशात उद्धव ठाकरे यांच्याकडून करंजकर यांची समजूत काढली जाणार काय?, करंजकर आपला बंड मागे घेणार काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून उमेदवार बदलण्यास खुद्द उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वेक्षणाचा आधार घेऊन करंजकर यांची उमेदवारी बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत देखील यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने देखील बदलाची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे एेनवेळी राजाभाऊ वाजे यांच्या नावावर तिन्ही पक्षांचे एकमत होऊन त्यांची उमेदवारी घोषित केली गेली.

संजय राऊतांकडून उमेदवारी
नाशिकमध्ये सतत दौरे करणारे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्या तोंडून देखील वारंवार विजय करंजकर यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले गेले. त्यामुळे मविआचे उमेदवार म्हणून करंजकर यांचे नाव निश्चित मानले जात होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना शब्द दिल्याने, करंजकर आपल्या उमेदवारीबाबत निश्चिंत होते. जेव्हा राजाभाऊ वाजे, ॲड. नितीन ठाकरे यांची नावे उमेदवारीसाठी पुढे आली, तेंव्हाही करंजकर यांनी आपल्या उमेदवारीबाबत आपण निश्चिंत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अचानकच राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी घोषित केल्याने, करंजकर दुखावले गेले.

आता कोणते आश्वासन?
शिवसेनेकडून गेल्या तीन पंचवार्षिक निवडणूकीपासून विजय करंजकर इच्छुक होते. मात्र, प्रत्येकवेळी त्यांची संधी डावलली गेली. विधान परिषदेच्या निवडणुूकीत तर संधी मिळून देखील, केवळ राज्यपालांनी यादी अमान्य केल्याने, त्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. आता लोकसभेची उमेदवारी कापल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना कोणते आश्वासन दिले जाईल? याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

The post विजय करंजकरांचा बंड आज होणार काय थंड? appeared first on पुढारी.