शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा सुशासन निर्देशांकात (डीजीजीआय – District Governance Index) नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत रायगड पहिला, तर गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. शासनाने वेगवेगळे १६१ निर्देशक व ३०० पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स असलेल्या दहा क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर हा निर्देशांक ठरविला आहे.

जनता व शासन यांच्यामधील अंतर कमी होत सुसंवाद निर्माण व्हावा या दृष्टीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुशासन निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. त्यानुसार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच २०२३-२४ च्या सुशासन अहवालाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एन. बी. एस. राजपूत यांसह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. (District Governance Index)

सुशासन निर्देशांक (District Governance Index) अहवालानुसार नाशिकने नागरिक केंद्रित प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या गटात गोंदिया आणि पुणे जिल्ह्यांनंतर नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. मानव संसाधन विकासातही नाशिक वरच्या क्रमांकावर आहे. सौनिक यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. जनहिताची कामे करणाऱ्या आमच्या संपूर्ण टीमसाठी ही बाब सुखद आश्चर्य ठरल्याची भावना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

सुशासन निर्देशांक अहवालातील कामगिरीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळाले आहे. पुढील वेळी अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा या निर्देशांकामुळे मिळेल. विशेषत: अजूनही काही क्षेत्रांमध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे. -जलज शर्मा, जिल्हाधिकारी.

सुशासन निर्देशांक गुण
रायगड : ५२८
गोंदिया : ५१८
नाशिक : ५१३

The post शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड appeared first on पुढारी.