सिंहस्थ बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार?

दादा भुसे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये सिंहस्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महत्त्वाचे असलेले शहरातील आमदार या बैठकीला अनुपस्थित होते. तिन्ही आमदार भाजपचे आहे. जिल्हास्तरीय समितीप्रमुखपदी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याशिवाय ही बैठक होत असल्याची किनार या अनुपस्थितीला होती अशा चर्चा या वेळी झडत होत्या. पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी मात्र, तसे काही नाही म्हणत या प्रकरणावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात भाजपचे देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल आहेर, दिलीप बोरसे असे एकूण पाच आमदार आहेत. पाचपैकी तीन मुख्य शहरातील मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सिंहस्थ आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी (दि.23) पालकमंत्री भुसे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी महापालिकेच्या वतीने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. त्यावर साधकबाधक चर्चादेखील झाली, मात्र भाजपच्या आमदारांनी फिरवलेली पाठ यावेळी चर्चेचा विषय ठरत होती.

२०२७-२८ मध्ये शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. राज्य नगरविकास विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रमुख शिखर समितीसह विविध प्रकारच्या चार समित्यांची स्थापना केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी व खर्चास मंजुरी देणे, नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सर्व विभागांत समन्वय ठेवणे अशा प्रकारची जबाबदारी असणार आहे. यात साधू-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, वीजव्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी या चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

दोन महिन्यांनंतर बैठकीला मुहूर्त

समिती स्थापन होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी समित्यांची बैठक झाली नव्हती. यावर नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गिरीश महाजन समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. परंतु जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तथा पालकमंत्री भुसे यांनी पालकमंत्री म्हणून सिंहस्थ आढावा बैठक बोलावली होती.

हेही वाचा :

The post सिंहस्थ बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार? appeared first on पुढारी.