३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोरोना चाचणी, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सरकारच्या अलर्टनंतर कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या तीन दिवसांत ३९ संशयित रुग्णांच्या ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या संभाव्य रुग्णांकरिता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ऑक्सिजनसह औषधोपचारांचीही सज्जता करण्यात आली आहे. (Nashik Corona Update)

केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता नाशिक जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केला असून, त्र्यंबकेश्वर येथील एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सिन्नरमध्येही दोन रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि पालिकेच्या वैद्यकीय विभागाने एकत्रित बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला आहे. वैद्यकीय विभागाने डॉ. झाकिर हुसेन व बिटको रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला असून बिटकोत दोनशे, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १०० बेडची स्वतंत्रपणे व्यवस्था केली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. (Nashik Corona Update)

आवश्यक साहित्य, औषधसाठा अद्ययावत

शहरातील रुग्णालये, उपलब्ध बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, चाचण्यांसाठी आवश्यक ॲन्टिजेन किट यांच्यासह आवश्यक औषधसाठ्याची माहिती अद्ययावत करण्यात आली. तसेच सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. बुधवारी ‘बिटको’त १२, सिडकोतील स्वामी समर्थ रुग्णालयात १, तर सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका संशयित रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय यंत्रणांनी तूर्त तरी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हेही वाचा :

The post ३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह appeared first on पुढारी.