Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम

मेहर सिग्नल नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावण्यासाठी सिग्नलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून ई-चलन प्रक्रियेचा मुहूर्त हुकला आहे. ४० पैकी निम्म्या सिग्नलवर सीसीटीव्ही व ई-चलन सिस्टिम लावण्यात न आल्याने १५ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यातच पोलिसांनी स्मार्ट सिटी कंपनीला झेब्रा पट्टे व सिग्नल अद्ययावत करण्यास सांगितल्याने संभ्रम कायम आहे. सध्या स्मार्ट सिटीकडून चाचपणी सुरू केल्याने ई-चलन प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत तयार झालेल्या शहरातील रस्त्यांवरील अद्ययावत तंत्रज्ञानासह सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ४५ सिग्नलवरील वाहतुकीचा संपूर्ण आढावा नियंत्रण कक्षातील भल्या मोठ्या ‘एलसीडी वॉल’वर पोलिसांना बघण्याची सुविधा झाल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासह बेशिस्तांना दणका देण्यासाठी ई-चलनाची तयारी पोलिसांनी सुरू केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका बैठकीत १५ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, १५ जूनच्या बैठकीत स्मार्ट सिटीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे सांगत हात झटकले.

दरम्यान, सन २०१७ पासून सीसीटीव्हींचा ‘फीड’ रेंगाळला होता. पाच वर्षांनंतर आयुक्तालयाच्या ‘कमांड कंट्रोल रूम’मध्ये दोन महिन्यांपासून सीसीटीव्हीचा ‘फीड’ येण्यास अखेरीस सुरुवात झाली आहे. मात्र, कॅमेऱ्यांद्वारे ई-चलान यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना मोकळे रान मिळणार आहे.

सीसीटीव्हीद्वारे शहरावर नजर

ऑप्टिकल फायबरच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘कमांड कंट्रोल रूम’ कार्यरत आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली नियंत्रित करण्यासह सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण शहरावर नजर आता राहणार आहे. या केंद्रात वायफाय सुविधा, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, हेल्पडेस्क या सुविधा उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम appeared first on पुढारी.