नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लांबलेल्या मान्सूनचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. यंदा जून महिन्यातील सरासरीच्या अवघ्या २० टक्के पर्जन्याची नोंद आतापर्यंत झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावरील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.

अल निनोचे संकट आणि अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. चार दिवसांपासून मान्सून सिंधुदुर्गातच अडकून पडला आहे. त्यामुळे लांबलेल्या मान्सूनचा फटका मुंबईसह अवघ्या राज्याला बसतो आहे. नाशिक जिल्हाही त्यामधून सुटू शकलेला नाही. जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ९३ मिमी इतके आहे. सध्या अर्धाअधिक जून महिना उलटला असताना केवळ १९ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. सरासरीशी त्याची तुलना केल्यास हे प्रमाण अवघे २० टक्के आहे.

लांबलेल्या मान्सूनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सर्वाधिक पाण्याची समस्या भेडसावते आहे. हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण भटकण्याची वेळ आली आहे. नाशिक शहराची परिस्थिती वेगळी नसून भूगर्भातील पाणीसाठा आटल्याने बाेअरवेल कोरडेठाक पडले आहेत. विशेष करून शहरातील उपनगरांमध्ये ही समस्या अधिक जाणवते आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी महापालिका आणि टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत २३ जूनपर्यंत मान्सून पाेहोचेल. त्यापुढे तीन ते चार दिवसांत तो राज्यात सर्वदूर हजेरी लावेल. मात्र, याकाळात त्याचा जोर अधिक नसेल. चांगल्या व दमदार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा करावी लागेल, असेही हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धरणांत केवळ २३ टक्के साठा

पावसाअभावी जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यातही झपाट्याने घट होत आहे. प्रमुख २४ प्रकल्पांत अवघा १५ हजार ५०९ दलघफू म्हणजेच २४ टक्के साठा शिल्लक आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८९५ दलघफू (३४ टक्के) पाणी असून, समूहातील चार प्रकल्प मिळून केवळ २३ टक्के म्हणजेच २३४७ दलघफू साठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास नाशिककरांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

हेही वाचा : 

The post नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद appeared first on पुढारी.