Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

उटीची वारी,wwww.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत उटीची वारी संपन्न झाली. संसार तापाने शिणलेले, शेकडो मैल पायपीट केलेले भाविक नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची उटी मस्तकी लावून कृतार्थ झाले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी उटीच्या वारीनिमित्त वारकरी भाविकांची गर्दी झाली होती. वाढत्या उन्हाने जिवाची काहिली होत असताना नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची शीतल उटी मस्तकी लेवून भाविक कृतार्थ झाले. शनिवार दशमीपासून भाविक पायी दिंड्यांनी आणि वाहनांनी शहरात दाखल झाले होते. मंदिर आणि परिसरात पेंडाॅल टाकून भजन कीर्तन सुरू होते. सकाळपासून कुशावर्तावर स्नानासाठी वारकऱ्यांची रीघ लागली होती.

वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यातदेखील भाविकांचा उत्साह दांडगा होता. रवीवारी एकादशीच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संत निवृत्तिनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त राहुल साळुंके, नारायण मुठाळ, अमर ठोंबरे, कांचनताई जगताप, लहवितकर महाराज, भाजप नेते लक्ष्मण सावजी, माजी विश्वस्त जिजाबाई लांडे, राजाराम चव्हाण, नित्य सेवेकरी मीराबाई यासह वारकरी उपस्थित होते. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान सभामंडपात नाथांच्या समाधीसमोर कीर्तन सुरू होते. टाळकरी, विणेकरी, पखवाज, मृदंग वादक तसेच शेकडो भाविकांनी धरलेला टाळ्यांचा फेर यामुळे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. उटी लावून झाल्यावर दर्शनरांग सुरू करण्यात आली. भाविक रात्री बारापर्यंत दर्शनासाठी रांगा लावून होते. रात्री बारा वाजता विधिवत पूजनाने उटी उतरवण्यात आली आणि भाविकांना ती प्रसाद म्हणून वाटण्यात आली.

हेही वाचा : 

The post Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ appeared first on पुढारी.