Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवार (दि. ५) नंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी शासनाकडून सर्वच शासकीय विभागांत खांदेपालट करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. २) महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. त्यामध्ये नाशिक विभागातील नऊ उपजिल्हाधिकारी तसेच ३५ तहसीलदारांचे आदेश शासनाने काढले. शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार एकाच पदावर तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत तसेच स्व-जिल्ह्यात सेवा बजावत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. एकाच दिवशी मोठ्या संख्येने बदल्या झाल्याने महसूल विभागात हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, अद्यापही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी आहे. दरम्यान, सोमवारनंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे. पहिल्या टप्प्यात बदल्या न झालेल्या अधिकाऱ्यांनी आता उर्वरित रिक्त पदांमधून मनासारख्या खुर्चीसाठी राज्यपातळीवर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येणार, हे बदल्यांचे आदेश हाती पडल्यानंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा:

The post Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा appeared first on पुढारी.