आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

Nashik Dist pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील काही लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास, युती आणि आघाडीच्या उमेदवारांना वंंचितसह अपक्षांच्या टेकूची गरज भासल्याचे दिसून आले. त्यासाठी युतीकडून वंचितला, तर आघाडीकडून अपक्षांंना प्रोत्साहन दिले गेले. यावेळी मात्र नाशिक लाेकसभा मतदारसंघात अपक्षांसह वंचित महायुतीसह, महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने, दोन्हीकडून अपक्ष अन् वंचित उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून फिल्डिंग लावली जात असल्याने, उमेदवारांच्या माघारीला चांगलाच ‘अर्थ’ प्राप्त झाला आहे.

देशात जातिभेद संपुष्टात आल्याचे कितीही ओरडून सांगितलेे जात असले तरी, निवडणुका या जातीच्या आधारेच पार पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. आजही विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता, ठराविक जातीचा उमेदवार आपल्या जातीच्या मतांची ‘व्होट बँक’ डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरताे. एखाद्या मतदारसंघात कोणत्या जातीचे किती प्राबल्य याचे गणित डोळ्यासमोर ठेवून उमेेदवार आपल्या विजयाचे सूत्र बांधतो. अर्थात, हे सूत्र बांधताना एखाद्या जातीचे मते आपल्या झोळीत पडत नसतील तर त्याठिकाणी त्या जातीचा अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून त्याला रसद पुरवित, दुसऱ्या उमेदवाराची मते खाण्याची खेळी त्या उमेदवारांकडून खेळली जाते. वंचित, एमआयएम, माकप, बसपा या पक्षांचे उमेदवार मते खाण्यासाठीच मैदानात उतरविले जात असल्याचा आरोप बऱ्याचदा झाला आहे. नाशिकमध्ये यापूर्वी वंचित असो किंवा बसपा या पक्षाच्या उमेदवारांनी युतीच्या उमेदवाराला एकप्रकारे बळ दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येते. यावेळीदेखील वंंचितचा उमेदवार मैदानात असल्याने, त्याचा फटका मविआच्या उमेदवारास बसून, महायुतीच्या उमेदवाराला लाभ होईल, असा अंदाज सुरुवातीला वर्तविला जात होता. मात्र, जातीपातीचा अन् अपक्षांचा विचार केल्यास ही शक्यता आता काहीशी मागे पडत असून, नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार हा मविआसह महायुतीलादेखील परवडणारा नसल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात मविआचे राजाभाऊ वाजे, महायुतीचे हेमंत गोडसे, वंचितचे करण गायकर आणि अपक्ष शांतिगिरी महाराज अशी चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे. मात्र, हे चारही उमेदवार मराठा असल्याने ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होऊन मराठा समाजाची मते विभागण्याची शक्यता असल्याने त्याची धास्ती मविआसह महायुतीच्या उमेदवारांनीदेखील घेतली आहे. त्यामुळे अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यासह वंचितचे करण गायकर यांच्या माघारीसाठी वरिष्ठ स्तरावरून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांंच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी मैदानात उतरल्याची माहिती समोर येत असल्याने, अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यासह वंचितचे करण गायकर यांच्या उमेदवारीला चांगलाच ‘अर्थ’ प्राप्त होताना दिसत आहे.

यांच्या माघारीकडेही लक्ष
ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे, भाजपचे अनिल जाधव हेदेखील अपक्ष म्हणून मैदानात असल्याने त्यांच्या माघारीसाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. विजय करंजकर यांनी समर्थकांचा मेळावा घेत, शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याने मविआच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. अरिंगळे मैत्रीपूर्ण लढतीवर ठाम आहेत. तर अनिल जाधवदेखील निवडणूक लढविण्याची मनीषा बाळगून आहेत. यांच्या माघारीसाठीदेखील वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.