इगतपुरीतील ‘लीड’ ठरविणार नाशिकच्या उमेदवाराचे भाग्य

इगतपुरी : वाल्मीक गवांदे

नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी मतदासंघात ७२.२४ टक्के मतदान झाले. यंदा मतदारसंघात विक्रमी मतदान झाल्याने वाढत्या मतदानाचा लाभ कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व शिवसेना उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात सरळ लढत झाल्याने इगतपुरीकर कोणाच्या बाजुूने कौल देतात हे पाहावे लागणार आहे.

तालुक्यात महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांत सरळ लढत झाल्याचे चित्र आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. मागील निवडणुकीत २०१९ मध्ये ५५ टक्के मतदान झाले होते. यंदा मतटक्का वाढल्याने याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. सोबतच ‘वंचित’कडून करण गायकर व अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजही रिंगणात आहेत. असे असले, तरी इगतपुरीत मुख्य लढत वाजे आणि गोडसे यांच्यातच झाली आहे. गोडसे यांनी हॅट्ट्रिक करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, तर ठाकरे गटाच्या माध्यमातून वाजे यांची इगतपुरी तालुक्यात असलेली पकड दाखवून देत त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. मतदारसंघात आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ तसेच माजी आमदार निर्मला गावित यांनी मतदारसंघात पुरेपूर ताकद लावून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. माजी आ. मेंगाळ यांनी शिंदे गटाकडून गोडसे यांना लोकसभेत पाठविण्यासाठी कसब पणाला लावले, तर महाविकास आघाडीकडून आ. खोसकर व माजी आ. गावित यांनी वाजेंसाठी ताकद लावली. लोकसभा निवडणूक आगामी विधानसभेची सेमी फायनल समजली जात आहे.

गेल्या वेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. यंदा मात्र, राजकीय परिस्थिती बदलली आहे. वरकरणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसत असला, तरी या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एका बाजूला, तर उर्वरित पक्ष महाविकास आघाडीबरोबर असल्याचे चित्र होते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा आदिवासीबहुल समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक ७२.२४ टक्के मतदान झाले असून, हेमंत गोडसे यांना तालुक्यातून सुमारे २० हजारांचा लीड मिळेल असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

विधानसभानिहाय मतदान

क्षेत्र                               मतदान                टक्के
सिन्नर :                 २ लाख १३ हजार            ४५ ६९.५०
नाशिक पूर्व           २ लाख १५ हजार            १५२ ५५.३८
नाशिक मध्य          १ लाख ८७ हजार           ४९१ ५७.१५
नाशिक पश्चिम        २ लाख ४७ हजार           ८२४ ५४.३५
देवळाली               १ लाख ७१ हजार            ८२४ ६५.०५
इगतपुरी / त्र्यंबक   १ लाख ९७ हजार            ९७५ ७२.२४

हेही वाचा: