कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

कांदा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– गेल्या एक महिन्यापासून कांदादरात मोठी घसरण झाली असून, निर्यातबंदीचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कमाल ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा कांदा २०८१ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. तीस दिवसांत बाजारभाव निम्म्याने खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिक येथे येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यांनी शेतकरी हित बघत केंद्राकडून लावलेली निर्यातबंदी उठविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कांदा निर्यातबंदी करून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय 7 डिसेंबर रोजी घेतला असून, या निर्णयास तीस दिवस पूर्ण झाले असून, या दिवसात साप्ताहिक सुट्ट्या वगळता विक्री झालेल्या कांद्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपये मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा हे नगदी पीक असल्याने सर्वच खर्च हा या पिकावर अवलंबून आहे. मात्र, कांदा भाव कोसळल्याने आर्थिक कोंडीत वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी हे नाशिकला येणार असल्याने त्यांनी कांदा उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन विक्री झालेल्या कांद्याला अनुदान आणि निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी केली आहे.

चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोदींनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील, असे संबोधले होते. मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यातबंदी, साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पाडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला आहे. सध्या ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी १२ तारखेला कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा:

The post कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार? appeared first on पुढारी.