चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

सप्तश्रृंगी देवी pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला येत्या मंगळवार (दि. १६) पासून सुरुवात होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक होणार आहे. यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १००, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून ५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून भाविक गडावर दाखल होत असतात. भाविकांची ही संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे. भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने जादा बसचे नियोजन केले आहे. यात्रा कालावधीसाठी राज्य परिवहन महामंडळाने नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तात्पुरते वाहतूक केंद्र उभारले आहे. नाशिक येथे जुन्या बसस्थानकात यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे.

विशेष कर्मचारी नियुक्त
भाविक तसेच घाटामध्ये चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी यू-टर्न, गणपती टप्पा, मंकी पॉइंट या भागात महामंडळाकडून विशेष कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आल्याची माहिती विभाग राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली.

असे आहे बसेसचे नियोजन
दि. १९ ते २३ एप्रिल…… १०० बसेस (प्रतिदिन)
नाशिक १ या आगारातून ७, नाशिक २ या आगारातून ३, मालेगाव १०, मनमाड ५, सिन्नर ५, इगतपुरी ५, लासलगाव ५, पेठ ५, पिंपळगाव ५ याप्रमाणे आगार ते थेट सप्तशृंगगड यादरम्यान एकूण ५० जादा बसेस.
परजिल्हा : धुळे, जळगाव जिल्ह्यातील आगारातूनही १०० च्यावर बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस appeared first on पुढारी.