जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

रेशन दुकानांतील धान्यसाठा आता ‘ई-पॉस’वर कळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील २-जी ई-पॉस मशीन्स‌ लवकरच हद्दपार होणार असून, त्यांची जागा ४-जी मशीन्स‌ घेणार आहेत. राज्यस्तरावरून २ हजार 608 मशीन्स‌ प्राप्त झाली आहेत. ही मशीन्स लवकरच दुकानांमधून ॲक्टिव्हेट करण्यात येणार असल्याने धान्य वितरण गतीने होण्यास मदत मिळेल.

फाइव्ह जी च्या काळात रेशन दुकानांमधून जुन्याच पद्धतीच्या ई-पॉस मशीन्सवरून धान्य वितरण केले जात आहे. टू-जीच्या प्रकारातील या मशीन्सला वारंवार नेटवर्कची समस्या येते. तसेच लाभार्थींचे अंगठेदेखील मशीन्सवर उमटत नसल्याने एका लाभार्थीला धान्य वितरणास किमान पाच ते सात मिनिटांचा कालावधी लागतो. काही वेळा लाभार्थींनी अंगठे दिल्यानंतरही मशीन्समधून पावती निघत नसल्याने दुकानदारांना धान्य वितरणात अडथळे निर्माण होत. यातूनच धान्य दुकानदार व लाभार्थी यांच्यात सातत्याने खटकेदेखील उडत असत. त्यामुळे ही मशीन्स‌ तातडीने बदलून देण्याची मागणी होत होती. परंतु, राज्याच्या पुरवठा विभागाकडून रेशन दुकानांच्या मागणीची दखल घेतली जात नव्हती. परिणामी, वर्षानुवर्षे टू-जी नेटवर्कच्या मशीन्सवरून होणाऱ्या धान्य वितरणाच्या तक्रारीत वाढ होत होती.

अखेर राज्याच्या पुरवठा विभागाने ४-जी प्रकारातील २ हजार 608 ई-पॉस मशीन्स् जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. येत्या महिनाभरात रेशन दुकानांमधून नवीन यंत्रांचा वापर सुरू होईल. त्यामुळे रेशनसाठी तासन‌्तास रांगेत उभे राहणाऱ्या लाभार्थींची परवड संपुष्टात येणार आहे.

असे आहे नवीन मशीन‌
पुरवठा विभागाला प्राप्त मशीन्स‌ हे ४ जी प्रकारातील आहे. या यंत्रात दोन सिमकार्ड बसू शकतील. याशिवाय चार्जिंगची सुविधा मशीन‌ला असून, वायफायद्वारेदेखील मशीन जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या मशीनपेक्षा नवीन मशीन आकाराने मोठे असून, ते संपुर्णत: टच स्क्रीन असल्याने ते हाताळण्यास अधिक सोपे आहे. मशीनमध्ये लाभार्थींच्या अंगठ्यासोबतच डोळ्यांच्या बायोमेट्रिकची सुविधा उपलब्ध आहे.

जिल्ह्यासाठी २६०८ रेशन दुकानांपैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ४८६ मशीन्स‌ प्राप्त झाले आहेत. १२२ मशीन्स‌ लवकरच येतील. नवीन मशिन्स‌ हे फोर-जी प्रकारातील असून, ते हाताळण्यास अधिक सोपे आहे. नाशिक धान्य वितरण अधिकारी, सुरगाणा व दिंडाेरीत या मशीनचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला असून, तेथे कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. – कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)

असे मिळाले फोर-जी मशीन्स‌
चांदवड १२२, बागलाण १८७, देवळा ६४, दिंडोरी १७३, धाविअ मालेगाव १४९, धाविअ नाशिक २२९, इगतपुरी १५१, कळवण १५०, मालेगाव १७५, नांदगाव १५६, नाशिक १५६, निफाड १५४, पेठ १३२, सिन्नर १४९, सुरगाणा १९०, त्र्यंबकेश्वर १२८, येवला १४०, एकूण २६०८.

हेही वाचा:

The post जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने appeared first on पुढारी.