‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

कांदा pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ता देवळा येथे मंगळवारी( दि १६) रोजी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे.

कांदा pudhari.news

कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे. कांदा शेती करण्यासाठी लागणार खर्च बघता त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही. म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात ” संपूर्ण गाव विकायला काढले” त्यावेळी माळवाडी येथे व्यथित शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा मूग गिळून गप्प असणारे विरोधकही आले नाहीत, म्हणून आज मत मागायला येऊ नका असे म्हणणे कांदा उत्पादक शेतकरी यांनी ठरवले आहे. आता आम्ही ठरवू कोणाला मत द्यायचे. असे प्रतिपादन यावेळी अविनाश बागुल यांनी केले.

केंद्र सरकार कांदा दर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवते, त्यात अमर्यादित निर्यातबंदी कांदा उत्पादकांच्या माथी मारत आल्याचा मोठा इतिहास हा देश बघतो आहे, परंतु या कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धर- सोड धोरणांमुळे कांदा उतपादन शेतकरी देशो-धडीला लागत चालला असल्याची खंत किशोर बागुल, शशी शेवाळे, दिलीप शेवाळे यांनी या प्रसंगी बोलून दाखवली.

शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहे. कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किंमतीत १० पट वाढ झाली आहे त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही. उलट मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते आणि इतर वाढत असलेली महागाई दुर्लक्षित केली जाते. जसे की गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, आरोग्य आणि शिक्षण महागाई याकडे लक्ष न देता कांदा विषय पुढं आणून राजकारण केलं जातं. या अशा राजकीय खेळीला आता माळवाडीसह सर्व शेतकरी जागृत झाला आहे. असे प्रसंगी नमूद झाले आहे.

याप्रसंगी सरपंच मयूर बागुल, खुशाल बागुल, किशोर बागुल, दिलीप शेवाळे, शशी शेवाळे, नाना सोनवणे, प्रतीक बागुल, जीभाऊ शेवाळे, अमोल बागुल, आबा गुंजाळ, राहुल बागुल, विशाल बागुल, गणू बागुल, अनिल जाधव, महेंद्र बागुल, मोहित वाघ, रमेश बागुल, प्रशांत बच्छाव, साहेबराव बागुल, रमेश बागुल, प्रवीण बागुल, विनोद आहेर, महेश बच्छाव, राजेंद्र बच्छाव, तात्या भदाणे, विठ्ठल पाटील, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडे आमचे लक्ष आहे हे दाखवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आता ‘कांद्याचे ट्रॅक्टर चालवणे’, ‘कांद्याच्या गरीवर कांदे निवडणे’ असे स्टंट करण्यापेक्षा पक्षादेश बाजूला ठेवून केंद्रात कांदा उत्पादकांना दर मिळवून देण्यासाठी भांडले पाहिजे. – अविनाश बागुल , माळवाडी शेतकरी

कांदा उत्पादकाने कोणाला मतदान करावे या विषयी आता आम्ही माळवाडीचे शेतकरी स्व खर्चाने या विषयी जनजागृती करणार आहोत.
दिलीप शेवाळे ,शेतकरी

कांदा प्रश्नावर अपयशी ठरलेले केंद्र सरकार व मुग गिळून गप्प असलेल्या विरोधी पक्षाच्या निषेधार्थ आम्ही प्रत्येक घरावर काळे झेंडे फडकवू. – विनोद आहेर, सरस्वती वाडी शेतकरी.

भारती पवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी कांदा गरीवर कांदे निवडण्याचे स्टंट करत आहे. आता हे स्टंट आम्हाला लक्षात आले आहे, त्यांनी पक्षादेश जुगारून कांद्याला दर मिळण्यासाठी जोरदार भांडले पाहिजे. असे मत कांदा उत्पादकांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा:

The post 'तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार'...कांदा उत्पादक appeared first on पुढारी.