नाशिकच्या रोकडोबा वाडीत पुर्ववैमन्यसातून युवकाची हत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाची कुरापत काढून सात जणांच्या टोळक्याने युवकाला मंगळवारी (दि.७) रात्री एकटे गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार करीत खून केला. या हल्ल्यात अरमान मुन्नावर शेख (१८, रा. सुंदरनगर) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अरमान शेख हा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वाहनावरुन सुंदरनगर येथे मित्रासोबत आला होता. त्यावेळी संशयित चंप्या उर्फ आकाश दिनकर याने अरमानला वाहन थांबविण्यास सांगितले. आकाशसोबत रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली हे होते. तर काही वेळात दुचाकीवरुन आकाश तपासे (रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड), टक्या उर्फ प्रेम व दोन अनोळखी तिथे आले. ‘तू आक्या भाईला मारतो का, घे आता रिप्लाय’, असे म्हणून आकाशने अरमानवर हत्याराने वार केले. त्यानंतर सारेजण पसार झाले. रहिवाशांनी अरमानला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र अरमानचा मृत्यू झाला होता. दरम्यान, उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. उपनगर पोलिसांनी अरमानच्या खून प्रकरणात संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली, आकाश दिनकर यांना ताब्यात घेतले आहे. इतर हल्लेखोरांच्या मागावर पथके रवाना करण्यात आली.

गुन्हा घडल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी यांचे पथक दाखल झाले. संतप्त नातलगांनी राग व्यक्त करत गुन्हेगारांच्या अटकेची मागणी केली. अरमानचा मित्र हितेश खलसे याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा –