नाशिकमधील नेपाळी युवकाच्या खूनप्रकरणात दोघांना अटक

अटक

नाशिक/सातपूर : पुढारी वृत्तसेवा- कामगारनगर परिसरात झालेल्या २२ वर्षीय हॉटेल कामगाराच्या खूनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. प्रेमप्रकरणावरून कामगाराच्या जोडीदारांनीच त्याचा गळा चिरून गच्चीवरून फेकून देत आत्महत्येचा बनाव रचला हाेता. ईश्वर शेर सार्की (२०) व प्रकाश गोविंदबहादूर शेटी (४२, दोघेही मुळ रा. नेपाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कामगारनगर येथील कौशल्या व्हिला येथे महेंद्रा सार्की याचा गळा चिरून गच्चीवरून फेकून देत खून झाला होता. सोमवारी (दि.१) हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सातपूर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट १ व २ व अंबड पोलिसांनी संयुक्त तपास करीत या गुन्ह्याची उकल केली. महेंद्रा याचे प्रेमप्रकरण ज्या मुलीसोबत होते, त्याच मुलीसोबत संशयित ईश्वर यानेही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजल्याने महेंद्राने ईश्वर यास मारहाण केली होती. त्याचा राग ईश्वरच्या मनात होता. महेंद्रा हा नेहमीप्रमाणे मध्यरात्री अडीच वाजता गच्चीवर जाऊन प्रेयसीसाेबत फोनवरून गप्पा मारत होता. त्यावेळी ईश्वरने महेंद्राचा गळा चिरून त्यास गच्चीवरून खाली फेकले. यात त्याला प्रकाशने मदत केली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाइल डिटेल्स तपासून व रुममधील इतर कामगारांकडे चौकशी करीत या गुन्ह्याची उकल केली. न्यायालयाने दोघा संशयितांना शनिवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे, गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.

आत्महत्येचा केला बनाव

संशयित ईश्वर सार्की याने सुरीने महेंद्राचा गच्चीवर गळा चिरून खाली फेकले. त्यानंतर घरात जावून गुपचूप झोपला. तसेच तो घरात गेल्यानंतर दुसरा संशयित प्रकाश यास घरात गेल्यावर घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावण्यास सांगितले. जेणेकरून महेंद्राचा खून नव्हे तर आत्महत्या आहे असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस तपासात त्यांचा डाव उघड झाला.

हेही वाचा :

The post नाशिकमधील नेपाळी युवकाच्या खूनप्रकरणात दोघांना अटक appeared first on पुढारी.