पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

टँकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागापाठोपाठ नाशिक शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडकोतील उंचसखल भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज टँकरच्या ५० फेऱ्या होत आहेत.

गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यातच मराठवाड्याकरिता नाशिक व नगरच्या धरणांतून पाणी सोडावे लागल्याने नाशिकमध्येही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७५३ गावे तसेच वाड्यांमध्ये २५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळी आली असताना, नाशिक शहरातही काही भागांत कमी दाबाने होणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.

आळंदी धरण pudhari.news
नाशिक : वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा खालावत चालला आहे. साधारण तीन महिने पाणी पुरविण्याचे आव्हान आहे. त्यात गिरणारे, दुगाव, आडगाव शिवार, नाईकवाडी, सारगाव आदी गावांची तहान भागवणाऱ्या आळंदी धरणात सध्या केवळ २७.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ८१६ दलघफू क्षमता असणाऱ्या या धरणात आजघडीला २२५ दलघफू साठा आहे. गतवर्षी याचवेळी ही पाणीपातळी ३५ टक्क्यांवर होती.
(छाया : हेमंत घोरपडे)

गत महिन्यात धरणांतून नाशिककरांना ६०२ दशलक्ष घनफूट पाण्याचा पुरवठा करण्यात आला. दररोज ५५६.३१ दशलक्ष लिटर इतके पाणी नाशिककरांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा होऊनही मनपा हद्दीतील इंदिरानगर, मखमलाबादमधील शंकरनगर, सातपूर तसेच पंचवटीतील काही भाग, जुने नाशिक, सिडकोमधील मोरवाडी, उत्तमनगर, विजयनगर, पवननगर आदी भागांत पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा प्रमाणात होत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित भागांत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
सध्या महापालिकेचे प्रत्येकी आठ हजार लिटर क्षमतेचे सहा टँकर सहा विभागांसाठी असून, दोन हजार लिटर क्षमता असलेला छोटा पाण्याचा टँकर आहे. पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे मनपाने आपल्या सात टँकरसह आणखी सहा टँकर ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू केले आहेत. एकूण १३ टँकरच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत ५० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले.

सद्यस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांकडून मागणी वाढल्यास टँकरच्या संख्येत वाढ केली जाईल. – रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा.

हेही वाचा:

The post पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या appeared first on पुढारी.