पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

टँकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत.

एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. विहिरी व अन्य नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणचे पाणी खोल गेल्याने हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. मात्र, पायपीट करूनही पाणी मिळेलच, याची शाश्वती कमीच असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच डोळ्यातील अश्रूदेखील कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी शासनाच्या टॅंकरवरच अवलंबून राहण्याची वेळ ग्रामीण जनतेवर ओढवली आहे.

ग्रामीण भागातील भीषण टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू केले आहेत. आजमितीस १२ शासकीव व २२६ खासगी अशा एकुण २३८ टँकरच्या माध्यमातून २१९ गावे व ४७७ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. यासर्व ठिकाणी पाणी पोहोचविण्यासाठी दिवसाकाठी टँकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. नांदगाव व येवल्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असून, या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ४९ व ४७ टँकर सुरू आहेत. याशिवाय बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, सिन्नर व सुरगाणा आदी तालुक्यांतही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने टँकरबरोबर १११ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. येत्या काळात उन्हाच्या वाढत्या कडाक्याबरोबरच टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टँकरची स्थिती
तालुका गावे-          वाड्या               संख्या
बागलाण                    35                    32
चांदवड                     70                    27
देवळा                       56                    29
इगतपुरी                    01                     01
मालेगाव                    107                   36
नांदगाव                     269                   49
सुरगाणा                      05                   02
सिन्नर                         76                   16
येवला                        77                    45
एकूण                      696

हेही वाचा:

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.