नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच पेटले असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पुढील आठवड्यात होत आहे. मोदींच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या १५ व १६ एप्रिल रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्यासह आदित्य ठाकरे, रोहित पवार, रोहित पाटील हे युवा नेतेदेखील नाशिकचे रण गाजवताना दिसणार आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवट्याच्या टप्प्यात २० मे रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान होत आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचारसभा, रॅली, रोड शो चे नियोजन केले जात आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. मोदी यांना उत्तर देण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्यासह उध्दव ठाकरे हेही मैदानात उतरणार आहेत. दिंडोरी मतदारसंघात शरद पवार तीन सभा घेणार आहेत. यात १५ मे रोजी वणी, १६ मे रोजी लासलगाव आणि नांदगाव या ठिकाणी पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तर नाशिक मतदारसंघाकरिता सय्यद पिंप्री येथे शरद पवारांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. १५ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होत आहे. शरद पवार हेही या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह संजय राऊत यांच्याही सभांचे नियोजन महाविकास आघाडीकडून केले जात आहे. १२ मे रोजी देवळाली येथे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सभा होत आहे. आदित्य ठाकरे यांची १७ मे रोजी सिन्नर आणि सिडको येथे सभा होत आहे. खा. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, रोहित पाटील, मेहबूब शेख, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याही सभांचे नियोजन महाविकास आघाडीकडून केले जात आहे.
मोदींची सभा पुढे ढकलली
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा १० मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे होणार होती. परंतू १० मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने सभेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती स्थानिक भाजप कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मोदींची सभा आता १० मे एेवजी ११ ते १४ मे या दरम्यान होईल. भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
The post प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार appeared first on पुढारी.