नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून ऐनवेळी भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित विजयश्री खेचून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या सुप्त लाटेवर स्वार झालेल्या पवारांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान पटकाविला. १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अडीच वर्षात केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालत त्यांनी दिल्लीत नाशिकरांची मान उंचावली. (Dindori Lok Sabha)
एकेकाळी अखंड राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून जिल्हा परिषदेची पायरी चढलेल्या डॉ. पवार यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज असलेल्या पवारांनी थेट भाजपाच्या गोटात सहभागी होत कमळ चिन्हावर निवडणूक लढल्या. मात्र, निवडणूक घोषित झाली असताना तिकीट मिळवणाऱ्या पवारांसाठी ही लढत सोपी नव्हती. कारण ९ तालूक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या दिंडोरीत त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने धनराज महाले यांच्या रुपाने आव्हान उभे केले होते. माजी आमदार व घरातून राजकीय वारसा लाभलेल्या महाले यांच्या पाठीशी पक्षाने सर्व शक्ती ऊभी केली. पण भाजपाचे संकटमोचक तथा जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच निवडणूक हातात घेतल्याने पवारांचा संसदेचा मार्ग सुकर झाला. (Dindori Lok Sabha)
दिंडोरी मतदारसंघातून ८ उमेदवार रिंगणात हाेते. तरी खरी लढत ही पवार, महाले तसेच माकपाचे जे. पी. गावित यांच्यातच पाहायला मिळाली. अतितटीच्या या लढतीत डॉ. पवार यांना ५ लाख ६७ हजार ४७० मते घेतली. तर प्रतिस्पर्धी महाले यांना ३ लाख ६८ हजार ६९१ मतदान पडले. त्याचवेळी गावित यांनी १ लाख ३४ हजार ५२७ मते घेतली. वंचितनेही निवडणुकीत उमेदवार देत ताकद आजमावली. त्यावेळी वंचितच्या बापू बर्डे यांना ५८,८४७ मते मिळाली. निवडणूकीत पहिल्या दोन क्रमांकावरील ऊमेदवारांमध्ये १ लाख ९८ हजार ७७६ मतांचा फरक होता. दुसरीकडे माकपा व वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांची गोळाबेरीज केल्यास ती १ लाख ९३ हजार ४०१ इतकी होती. त्यामुळे एकुणच लढतीचे चित्र पाहता पवारांच्या विजयामध्ये माकपा आणि वंचितची भुमिका निर्णायक ठरली.
मतदारसंघाची स्थिती (Dindori Lok Sabha)
-२००९ च्या पुर्नरचनेत मालेगाव मतदारसंघ बाद होऊन नऊ तालुक्यांचे
कार्यक्षेत्र असलेला दिंडोरी हा आदिवासीबहुल राखीव मतदार संघ अस्तित्वात
आला.
-मार्च महिन्यात मनमाड येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीने धनराज महाले
यांची ऊमेदवारी घोषित केल्याने नाराज झालेल्या डॉ. भारती पवारांनी
हातावरील घड्याळ उतरवित २२ मार्च २०१९ ला मुंबईत तत्कालिन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हाती घेतले.
-२००४ पासून पूर्वाश्रमीचा मालेगाव व त्यानंतरच्या दिंडोरी मतदारसंघात
भाजपाचे हरिशचंद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्रिक साधताना तळगाळात कमळ
पोहचविण्याचे कार्य केले. त्यामूळे चव्हाणांना डावलून पवारांना उमेदवारी
देण्याचा धोका भाजपाने पत्करला.
-२०१९ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातंर्गत असलेल्या ६ विधानसभा
मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन आमदार होते. तर भाजपा, शिवसेना व माकपाचा
प्रत्येकी एक आमदार होता.
-येवल्यात मंत्री छगन भुजबळ व नांदगावमध्ये माजी आमदार पंकज भुजबळ यांचे
वर्चस्व असताना ही लोकसभेत पवारांनी या दोन्ही मतदारसंघातून मताधिक्य
प्राप्त करत पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला.
The post फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही! appeared first on पुढारी.