मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

मनमाड : पुढारी वृत्तसेवा
मार्च एंडचा हिशोब आणि त्यानंतर हमाली, तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या १६ दिवसांपासून बाजार समितीत कांदा, धान्य लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे खळ्यात, चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे लिलावामुळे रोज होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने बाजार समितीच्या उत्पनावर परिणाम झाला असून आतापर्यंत बाजार समितीला सुमारे १० लाख रुपयाचा फटका बसला आहे. शिवाय बाजार समिती, व्यापाऱ्यांच्या खळ्यावर काम करणरे मजूर आणि इतर घटकावर उपासमारीची वेळ आली आहे.

एकीकडे व्यापारी आणि माथाडी यांच्या वादामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, मजूर भरडला जात आहे. दुसरीकडे मंत्री, खासदार, आमदार, राजकीय पक्षापासून सर्वच अधिकारीही लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असल्यामुळे वादावर तोडगा काढणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, लिलाव सुरू करा अन्यथा तुमचे परवाने रद्द करू तसेच तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सवलती काढून घेऊ अशी नोटीस व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती सभापती दीपक गोगड यांनी दिली आहे.

बाजार समित्यात कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्यापारी हमाली, तोलाईची कपात करून ती माथाडी कामगारांना देण्याची गेल्या अनेक वर्षाची प्रथा (नियम) आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी अचानक हमाली, तोलाई कपात करण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयाला माथाडी कामगारांनी विरोध केल्यानंतर वाद निर्माण होऊन व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन एका प्रकारे अघोषित संप सुरू केला आहे. बाजार समितीत लिलाव बंद केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी खासगी जागेत लिलाव सुरू केले. मात्र, असे लिलाव बेकायदेशीर ठरवून बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाने व्यापाऱ्यान नोटीस पाठवून बाजार समितीत लिलाव सुरू करा अन्यथा तुमचे परवाने रद्द तर करूच शिवाय तुम्हाला व्यापार करण्यासाठी दिलेली जागा आणि इतर सावली काढून घेण्याचा इशारा दिला आहे.

खासगी जागेवर लिलाव सुरू करण्यात आले. मात्र, पुढे व्यापाऱ्यांनी पैसे नाही दिले किंवा खळ्यावर वांदा केला तर आम्ही तक्रार कुठे करणार ? बाजार समितीमुळे आम्हाला एका प्रकारे सुरक्षेचे कवच आहे. जर तोच राहिला नाही तर आगीतून फुफ्याट्यात गेल्या सारखी आमची अवस्था होईल. तसेच अशा खासगी जागेवर लिलाव सुरू झाले तर बाजार समित्याचा अस्तित्वच धोक्यात येईल. शेतकऱ्यासाठी बाजार समित्या महत्वाच्या आहे. – एस. के. काळे, शेतकरी.

हेही वाचा:

The post मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच appeared first on पुढारी.