‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

Civil Hospital Nashik pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सरकारी कार्यालयांकडील कर थकबाकी वसुलीकडे महापालिकेने मोर्चा वळविला असून, १.१० कोटीच्या पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ‘मार्च एण्ड’साठी आता जेमतेम सहाच दिवस राहिले असून, या मुदतीत निर्धारित उ‌द्दिष्टापैकी घरपट्टीचे तब्बल १७ कोटी, तर पाणीपट्टीचे २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे.

जीएसटी अनुदानाखालोखाल घरपट्टी, पाणीपट्टी व नगररचना विभागाकडून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात जीएसटी अनुदानापोटी महापालिकेला दरमहा १०७.०१ कोटी याप्रमाणे वार्षिक १,२८४ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. घरपट्टीसाठी २१० कोटींचे, तर पाणीपट्टीसाठी ७५ कोटींचे सुधारित उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या कार्यकाळात करवसुली मोहिमेने वेग घेतला होता. परंतु ‘मार्च एण्ड’ जवळ असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांची मूळ विभागात बदली झाल्यामुळे महापालिकेचा कर वसुली विभाग पोरका झाला आहे. थकबाकीदारांविरोधातील करवसुली मोहीमही थंडावली आहे. त्यामुळे २५ मार्चअखेर घरपट्टीतून १९३ कोटी, तर पाणीपट्टीतून ५०.५८ कोटींचा महसूल महापालिकेला मिळू शकला आहे. उर्वरित सहा दिवसांत घरपट्टीतून १७ कोटी, तर पाणीपट्टीतून २५ कोटींचा महसूल मिळविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयांकडील थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने तगादा लावला आहे. जिल्हा रुग्णालयाकडे पाणीपट्टीची १.१० कोटींची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय हे अत्यावश्यक व अतिदक्षता सेवेत असल्यामुळे महापालिकेने तातडीने काेणतीही कारवाई केलेली नाही.

फेरमूल्यांकनाच्या आदेशांमुळे रखडली वसुली
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या अवाजवी घरपट्टीवाढीला ब्रेक लावत घरपट्टीचे फेरमूल्यांकन करण्याचे निर्देश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे घरपट्टी वसुली मंदावली आहे. घरपट्टी वसुलीचा यापूर्वीचा वेग पाहता, २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचा आकडा २२५ कोटींवर जाण्याची शक्यता होती. परंतु शासन आदेशांनंतर करदात्यांनी महापालिकेच्या कर संकलन केंद्रांकडे पाठ फिरवली असून ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

नव्या मिळकतींतून ६२ कोटी
घरपट्टीचा महसूल वाढविण्यासाठी शहरातील नवीन मिळकती शोधून त्यावर कर आकारणी सुरू करण्याची मोहीम महापालिकेने गेल्या काही महिन्यांत राबविली. त्याचा फायदा महापालिकेला झाला असून, ३२ हजार ३०० नवीन मिळकतींवर कर आकारणीच्या माध्यमातून महापालिकेला तब्बल ६२ कोटींचा महसूल मिळाला आहे. भागनिहाय याद्या वसुली निरीक्षकांना देण्यात आल्या असून, थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विविध करांशी संबंधित शासनाकडून मिळणारे अनुदान अद्याप अप्राप्त आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, निधी प्राप्त झाल्यानंतर थकीत कर भरणार आहे. – डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक.

हेही वाचा:

The post 'मार्च एण्ड' : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.