मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरत रास्ता रोको केला. यावेळी प्रांताधिकारी नितीन सदगीर व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला.
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे येथील रहिवाशी हभप सीताराम सूर्यवंशी हे शेतातून दोन्ही नाती मंजुषा व वैष्णवी यांना दुचाकी (क्रमांक एमएच 41 एडी 1254) वरुन सकाळी 7 वाजेच्या सुमारास शाळेत सोडण्यासाठी येत होते. त्याच सुमारास सप्तशृंगीगडावरुन श्रीरामपूर आगाराची बस (क्रमांक एमएच 20 बीएल 1594) ही मालेगावकडे भरधाव वेगाने येत असताना मुंगसे फाट्याजवळून रस्ता ओलांडणार्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकी बसला अटकल्याने बसने दुचाकीला सुमारे 150 ते 200 फुटापर्यंत फरफटत नेले. यात सीताराम सूर्यवंशी (60) व नात वैष्णवी सूर्यवंशी (11) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात मंजुषा (13) ही गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मंजुषाला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांंच्या लांबचलांब रांगा लागल्या. या रास्ता रोकोची माहिती मिळाताच प्रांताधिकारी सदगीर व अपर पोलीस अधीक्षक भारती यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वारंवार होणार्या अपघातांना कटांळून महामार्गावर गतीरोधक बसवावेत, गावाजवळ उड्डाणपुल करावा व अपघातातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी महामार्ग रोखून धरला. सरपंच रंजना पिंपळसे, उपसरपंच जगदीश सूर्यवंशी, माजी सरपंच रवींद्र सूर्यवंशी, श्रावण सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांशी सदगीर व भारती यांनी चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेले हभप सीताराम सूर्यवंशी व त्यांची नात वैष्णवी यांचा मृतदेह मालेगावी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शोकाकूल वातावरणात आजोबा व नातीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नात व नातू असा परिवार आहे.
बडोदा बँकेत दिला हयात असल्याचा दाखला
हभप सीताराम सूर्यवंशी हे मालेगाव येथील बाजार समितीत गेल्या 27 वर्षापासून हमाली व मुकादमचे काम करीत होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुलगा विजय हा नोकरीला लागला आहे. सूर्यवंशी यांचे सोनज येथील बडोदा बँकेत खाते आहे. या बँकेत सोमवारी (दि.15) रोजी ते हयात असल्याचा दाखला देवून आले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी मंगळवारी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेवटचा पेपर राहूनच गेला
हभप सूर्यंवशी यांची मोठी नात मंजुषा ही इयत्ता नववी तर दुसरी नात वैष्णवी ही इयत्ता सातवीत गावातीलच केबीएच विद्यालयात शिकत होती. वैष्णवी हिचा सातवीचा परिसर विषयाचा शेवटचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी ती आजोबा व मोठ्या बहिणी बरोबर येत होती. शाळेत पोचण्यापुर्वीच तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे तिचा शेवटचा पेपर देण्याचे व मैत्रिणींना भेटण्याचे स्वप्न अधुरेच राहून गेले.
हेही वाचा –
- Manchar : शेतीपंपाच्या भारनियमनात सुधारणा करा; अन्यथा आंदोलन
- Lok Sabha Election 2024 | नाराज पदाधिकारी लवकरच प्रचारात सहभागी होतील – कोतवाल
- Lok Sabha Election 2024 | दिंडोरीत एकमेकांचे विरोधकच झाले प्रचारक, मतदारही बुचकळ्यात
The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.