मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब

मोदी नाशिक दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यातील नाशिक दौऱ्यात अवघ्या तीन दिवसांतच कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्यानंतर आता या खर्चाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेसह विविध यंत्रणांना दिले आहेत. या खर्चाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करताना महापालिकेच्या विविध विभागांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र आहे.

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात महोत्सवाच्या उद‌्घाटनाखेरीज मोदींचा रोड शो आणि पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन व गोदाआरतीही करण्यात आली. मोदींच्या या दौऱ्यानिमित्त संपूर्ण शहरालाच उत्सवाचे स्वरूप आले होते. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात दोनदा नाशिकला हजेरी लावत विविध यंत्रणांना नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री दादा भुसे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, तर या दौऱ्याच्या नियोजनासाठी चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. या दौऱ्यासाठी शासनाकडून तब्बल ५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातून मुख्य सोहळ्याचे आयोजन, रोड शो, विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनासह रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांची निर्मिती, गोदाघाट परिसराचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, विद्युतीकरण, मंदिर, गोदाघाटावरील पूल आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, वाहतूक बेट, दुभाजकांची स्वच्छता-रंगरंगोटी, स्वागत फलक उभारणी आदी कामे करण्यात आली. शासनाच्या क्रीडा विभागाच्या खालोखाल महापालिकेकडून विविध कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. शासनाकडून आलेला निधी महापालिकेला वर्ग केला जाणार आहे. या दौऱ्यानिमित्त सढळ हाताने खर्च झाला असला, तरी त्यात अनागोंदीचा प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेतली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शासनाने महापालिकेला विविध कामांवरील खर्चाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाकडून केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालयाला हा हिशेब सादर केला जाणार असल्याचे समजते.

खर्चाची होणार पडताळणी

दौऱ्याच्या नावावर झालेल्या प्रत्येक बारीकसारीक खर्चाची माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. विशेषत: दौऱ्यासाठी खरेदी केलेल्या फुलांचे दर, विविध वस्तूंच्या किमतींची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे आदी दौऱ्याच्या तयारीत आठवडाभर व्यग्र असलेले महापालिकेतील अधिकारी आता खर्चाचा हिशेब सादर करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यग्र असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post मोदींच्या नाशिक दौऱ्यात कोट्यवधींचा खर्च, आता द्यावा लागणार हिशेब appeared first on पुढारी.