नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार असून, त्यात नाशिकचा समावेश असल्याचे बाेलले जात आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतरच सभेबबातचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या गुढीपाडव्याला शिवतीर्थावर घेतलेल्या जाहीर सभेत राज यांनी, महायुतीला बिनशर्त पाठिंबा घोषित केला. त्यानंतर शनिवारी (दि. १३) त्यांनी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीत आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. प्रचाराची जबाबदारी मनसेच्या नेत्यांवर सोपविण्यात येणार असून, त्याची यादी एक ते दोन दिवसांत जाहीर केली जाईल. विशेषत: भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने मनसेच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क करायचा आणि समन्वय साधायचा, यासंदर्भात यादी दिली जाईल. त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल, असे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट झाल्यानंतर ते कोणत्या शहरात सभा घेणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज यांची सभा होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यासाठी ते प्रमुख स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत सभेबाबतची रूपरेषा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे आगामी विधानसभेची तयारी म्हणून राज ठाकरे यांच्या नाशिकच्या सभेला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.
कोणाचा प्रचार करणार?
महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसून, अनेकांची नावे उमेदवारीसाठी सातत्याने पुढे येत आहेत. भाजपदेखील नाशिकच्या जागेवर दावा करीत असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी प्रबळ मानली जात असल्याने उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हा प्रश्न कायम आहे. या सर्व घडामोडीत राज ठाकरे कोणाच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये सभा घेणार याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा –
- सोन्याच्या बाजारभावात ‘या’ रेकॉर्डची शक्यता..!
- Nashik Crime News | एमडी तस्कर पगारे, पिवाल टोळीवरील मोक्का नाकारला
- मुंबई : सलमान खानच्या घरावर गोळीबारामागे बिष्णोई टोळीच; संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरु
The post राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात appeared first on पुढारी.