लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दोन्ही मतदारसंघांतून ५१ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाआघाडीतील बंडखोरांनीदेखील अर्ज भरल्याने पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपली आहे. नाशिक तसेच दिंडोरी या मतदारसंघांत शनिवारी (दि. ४) दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी नाशिकमधून ३६, तर दिंडोरी मतदारसंघातून १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नाशिक मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनीदेखील निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे अनिल जाधव यांनीदेखील बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. त्यात शांतिगिरी महाराज हेदेखील निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे.

दिंडाेरी मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या माकपकडून माजी आमदार जे. पी. गावितदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही युती व आघाडीला बंडखोरीने ग्रासले आहे. युती व आघाडी बंडखाेरांना कशी थोपविते तसेच लोकसभेच्या आखाड्यामधून कोण कोण माघार घेणार याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

चिन्हाचे होणार वाटप
लोकसभा निवडणुकीत माघारीसाठी सोमवारी (दि. ६) दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर १८ व्या लाेकसभेसाठीच्या लढती अंतिम होतील. माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर लगेचच उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. त्यामध्ये अपक्ष उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे पसंतीचे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.

माघारीसाठी अर्ज उपलब्ध
निवडणूक आयोगाकडून अर्ज माघारीसाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अर्ज भरून स्वत: उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उपस्थित राहावे लागेल. अन्यथा, अनुमोदकाला प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्याचे पत्र व त्या पत्रावर स्वाक्षरीचा नमुना देणे बंधनकारक आहे. ऑनलाइन किंवा अनुमोदकाला परस्पर उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा अधिकार नाही.