वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

थविल pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने वंचितने राज्यभरात उमेदवार घोषित करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीच या मतदार संघात दुर्लक्षित भिल्ल समाजाचे गुलाब बर्डे यांना उमेदवारी घोषित केली होती. १९८६ मधील ते महाराष्ट्र केसरी असून, दिंडोरी या आदिवासी राखीव मतदारसंघात भिल्ल समाजाच्या मतदारांची संख्या लक्षात घेवून त्यांना मैदानात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने अन् त्यांना मधूमेहाचा त्रास असल्या कारणाने त्यांची उमेदवारी रद्द केल्याचे वंचितचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मालती शंकर थविल या सरपंच असून, त्या आदिवासी कोकणा हिंदू आहेत. तर पती राहुल डेमसे मराठा असून, त्यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे. त्यामुळे आदिवासी व मराठा समाज असे गणित डोळ्यासमोर ठेवून वंचितने मालती थविल यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

गतवेळी वंचितला 60 हजारांवर मत
मागील लोकसभेच्या निवडणूकीत दिंडोरी मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मुख्य लढत पाहायला मिळाली असली तरी, वंचितच्या उमेदवाराने देखील त्यावेळी ५८ हजार ८४७ मते मिळविली होती. यावेळी देखील दिंडोरीचे वातावरण तापले असून, भाजपकडून डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे मैदानात आहेत. तसेच माकपाचे जे. पी. गावित बंडखोरीच्या तयारीत असल्याने, वंचितचा उमेदवार विजयाचे सूत्र कसे जुळवून आणणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. दिंडोरी लोकसभा मतदार संघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून, राज्यकर्त्यांना ते सोडविण्यास अपयश आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या निर्धारातून मतदारांपर्यंत पोहोचणार. – मालती थविल, उमेदवार, वंचित.

हेही वाचा: