वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

रीअल इस्टेट pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, सराफ बाजार, वाहन बाजाराबरोबरच गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात चैतन्याचे वातावरण असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेषत: रिअल इस्टेट आणि सराफ बाजारात मोठ्या उलाढालीची अपेक्षा असल्याने, व्यावसायिकांनी ग्राहकांच्या स्वागतासाठी त्या दृष्टीने तयारी केली आहे. अनेकांनी आकर्षक ऑफर्सही उपलब्ध करून दिल्या आहेत.

मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, व्यापाऱ्यांनी त्यादृष्टीने तयारी केली आहे. गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्याने, रविवारी (दि. ७) बुकिंगसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, फॅन, ओव्हन आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले. मोबाइल बाजारातही मोठी गर्दी दिसून आली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी एक्स्चेंजसह वस्तू खरेदीवर बोनसची ऑफर उपलब्ध करून दिल्याने, ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेताना दिसून येत आहे. वाहन बाजारातदेखील रविवारी दुचाकी आणि चारचाकी बुकिंगसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. चारचाकीमध्ये एसयूव्ही कारला अधिक पसंती दिली जात असल्याने, अनेकांकडून या कार खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. सध्या सर्वच वाहन कंपन्यांनी एकापेक्षा एक आधुनिक फिचर्स असलेली वाहने बाजारात उपलब्ध करून दिल्याने, ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. दुचाकींमध्येही इलेक्ट्रॉनिक तसेच पेट्रोलचा पर्याय असल्याने, ग्राहक त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत. विशेषत: स्पोर्टस् दुचाकी खरेदीकडे तरुणाईचा अधिक कल दिसून येत आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील चैतन्याची गुढी उभारली जाणार आहे. यंदा रेडीरेकनरच्या दराबरोबरच रेपो रेट स्थिर ठेवल्याने, घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत झाली आहे. परिणामी, या संधीचा लाभ घेऊन अनेकांकडून गृहस्वप्न पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहकांकडून साइट व्हिजिट वाढल्या असून, अनेकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंगचे नियोजन केल्याचे रविवारी दिसून आले. एकंदरीत गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेमध्ये उत्साहाचा गोडवा जाणवत असल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तीनशे कार, दोन हजार दुचाकी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून, व्यावसायिकांच्या मते तीनशे कार आणि दोन हजार दुचाकींची विक्री होण्याची शक्यता आहे. वर्षाचा पहिलाच सण असल्याने, अनेकांकडून खरेदीचे नियोजन केले जात असते. त्यामुळे दुचाकीबरोबरच चारचाकीची मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. सध्या जवळपास कोणत्याच कार आणि दुचाकीला वेटिंग नसल्याने, ग्राहकांना मुहूर्तावर डिलिव्हरी दिली जाईल, असा व्यावसायिकांना विश्वास आहे.

सोने उच्चांकी; खरेदी जोरात
जागतिक स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सध्या सोने-चांदी दरात सातत्याने वाढ होत आहे. २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याने ७१ हजारांचा आकडा पार केल्याने, सोन्याची ही उच्चांकी दरवाढ आहे. चांदीदेखील ८० हजार पार गेली आहे. असे असले तरी, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाण्याची शक्यता आहे. अनेकांनी रविवारी सुटीचा वार बघून सोने-चांदी बुकिंग केले आहे. सराफ व्यावसायिकांच्या मते, सोने, चांदीत गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढल्याने दरवाढीचा फारसा परिणाम दिसून येणार नाही.

हेही वाचा:

The post वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल appeared first on पुढारी.