सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

स्कॅमर्स pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन सुरू झाल्यापासून अनेक जण स्कॅमर्सच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. कधी नोकरीचे आमिष, तर कधी विविध आफर्सचे गाजर दाखवून अनेकांची लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एखाद्या फसवणुकीच्या पद्धतीविषयी नागरिक सतर्क होत नाही, तोच नवीन फसवणुकीचा प्रकार समोर येत असल्याने आजही या भामट्यांना लोक बळी पडत आहेत. आता ‘पैसे क्रेडिटचा मेसेज’ हा नवा फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर वेळीच सावध व्हा.

एका शिक्षित तरुणीची अशीच फसवणूक झाल्याची बाब समोर आली असून, तिने सांगितले की, तिला एका शर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. तिच्या वडिलांचे व्यवहार शर्मा नावाचे सनदी लेखापाल सांभाळत असल्याने, कदाचित तो त्यांचाच फोन असावा असे तिला वाटले. त्याने तिला तुझ्या वडिलांचे ‘गुगल पे’ चालत नसल्याने त्यांनी मला तुझ्या गुगल पेवर १२ हजार रुपये पाठविण्यास सांगितले, अशी बतावणी केली. त्यानंतर काही वेळातच तिच्या मोबाइलवर दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज धडकला. पाठोपाठ वीस हजार जमा झाल्याचा मेसेज आला. हे दोन्ही मेसेज बँकेकडून येणाऱ्या मेसेजप्रमाणेच हुबेहूब होते. त्यामुळे आपल्या खात्यावर तीस हजार रुपये जमा झाल्याचे तिला वाटले. त्यानंतर लगेचच त्या शर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. सुरुवातीला दहा हजार पाठविल्यानंतर मला तुला दोन हजार रुपये पाठवायचे होते, मात्र, चुकीने माझ्याकडून वीस हजार पाठविले गेले. त्यामुळे त्यातील १८ हजार रुपये तू मला परत या क्रमांकाच्या गुगल पे वर पाठव असे त्याने सांगितले. तिनेदेखील कुठलीही खातरजमा न करता १८ हजार त्या व्यक्तीस पाठविले. त्यानंतर त्या तरुणीला तिच्या वडिलांचा फोन आला, त्यांना जेव्हा याविषयी तिने विचारले तेव्हा मात्र माझे अन् सीएचे याविषयी कुठलेही बोलणे झाले नसल्याचे ते म्हणाले. तेव्हा मात्र तिला शंका आली अन् तिने लगेचच आपल्या खात्यावर बॅलन्स चेक केला. तेव्हा फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान, या भामट्यांकडून अशाप्रकारे फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत असून, नागरिकांनी फोनवर अशा प्रकारचे कुठलेही व्यवहार करू नये, खातरजमा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.

भामट्यांकडे संपूर्ण कुंडली
या भामट्यांकडे ज्यांची फसवणूक करायची असते, त्याची संपूर्ण कुंडली असते. मोबाइल नंबरसह त्यांच्याकडे आपले नाव, वडिलांचे नाव तसेच कुटुंबांतील इतरांचीही नावे असतात. त्यामुळे या माहितीच्या आधारे एखाद्याची फसवणूक करणे त्यांना सहज शक्य होते. हिंदी भाषेतून ते संवाद साधतात. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण संतापात त्यांना पुन्हा फोन करतो. त्यानंंतरही त्यांची चालबाजी सुरूच असते. ते म्हणतात की, तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाल्याच्या मेसेजचा आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही तुम्हाला पैसे परत पाठवू. असा स्क्रीनशॉट पाठविल्यास पुन्हा फसवणूक होण्याची शक्यता असते.

या नावांपासून राहा सावध
मोहम्मद, मनोज मिश्रा, अभिषेक कुमार या नावांनी फोन करून हे भामटे अनेकांची फसवणूक करीत आहेत. आम्ही भिवंडी येथून बोलत असल्याची बतावणीदेखील त्यांच्याकडून केली जाते. या भामट्यांची टोळीच असून, ते परराज्यात बसून फसवणूक करतात. त्यामुळे पोलिसांनादेखील त्यांच्या मुसक्या आवळणे बऱ्याचदा शक्य होत नाही. धक्कादायक म्हणजे, एकदा पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले की, ते स्वत: ‘मैने तुमको ठग लिया है, अब आपको जो करना है वो कर लो, पुलिस भी हमारा कुछ न कर सकती’ असे सांगून फसवणूक झालेल्यांवर हसतात.

हेही वाचा:

The post सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक appeared first on पुढारी.