अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवाकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांत नवमतदारांच्या नोंदणीसह मतदार यादीत महिलांचा टक्का वाढावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार 5 जानेवारी रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघात अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी होणार होती. परंतु, आयोगाने नव्याने आदेश काढत यादीच्या प्रसिद्धीला मुदतवाढ दिली आहे.

आयोगाच्या नवीन आदेशानुसार १२ जानेवारीपर्यंत मतदारयादीवरील दावे आणि हरकती निकाली काढता येणार आहेत. तर १७ तारखेला मतदारयादीची तपासणी व छपाई केली जाईल. तसेच २५ जानेवारीला अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी करायची आहे. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी निवडणूक शाखेला 15 दिवसांचा अधिक कालावधी मिळणार आहे.

१.१४ लाख मतदार वाढले

निवडणूक शाखेकडून २७ सप्टेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद‌्ध केल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ४६ लाख ५० हजार ६४० इतकी होती. गेल्या दाेन महिन्यांमध्ये निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे जिल्ह्यात नव्याने १ लाख १३ हजार ९३४ मतदार वाढले आहेत. सद्यस्थितीत मतदारसंख्या ४७ लाख ६४ हजार ५७४ वर पाेहोचली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार २४ लाख ८४ हजार ३३३, महिला मतदार २२ लाख ८० हजार १२८, तर तृतीयपंथी ११३ मतदार आहेत.

हेही वाचा :

The post अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश appeared first on पुढारी.