अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत

विनायक राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नासाडी झाली असताना राज्याचे प्रमुख तेलंगणात लोचटगिरी करीत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधताना अवकाळी-गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत हेक्टरी किमान ५० हजारांची मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला आहे.

अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ठाकरे गटाचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात खा. राऊत, नितीन बाणगुडे-पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खा. राऊत यांनी, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार बाहेर मौजमजा करत असल्याचा आरोप केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. पण, तेलंगणामध्ये जाऊन लोचटगिरी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार अधिवेशन चालू देणार नाही, असे राऊत म्हणाले. गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहे. अजित पवार आणि शिंदे गट इतर राज्यात जाऊन प्रचार करतात. लोकांनी तिथंदेखील यांचा धिक्कार केल्याचे राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरूनही राऊत यांनी शासनावर टीका केली. सत्तेचा माज आलेले मिंधे सरकार पोलिसबळाचा वापर करतेय. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात त्याप्रमाणे कारवाई करत दळवी यांना पकडले. पण, पूर्वी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

भुजबळांच्या वक्तव्यांमागे मुख्यमंत्री?

मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी सरकारमधील लोकांकडूनच प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करत आहेत हे योग्य नाही. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार होतोय असा संशय व्यक्त करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भुजबळांचा राजीनामा मागण्याचे धाडस केले तसे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवे, अशी मागणीही राऊत (Vinayak Raut) यांनी केली.

हेही वाचा :

The post अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत appeared first on पुढारी.