आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

हिरामण खोसकर www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाईन; इगतपुरीतून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार हिरामण खोसकर नॉटरिचेबल असून ते कॉंग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाच्या वतीने पत्र प्रसिद्ध करुन त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आमदार हिरामण खोसकर हे 5 फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्या वतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेलेले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आमदार खोसकर यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र सध्य स्थितीतून तसे काहीही नसल्याचा खुलासा त्यांनी पत्रातून केला आहे. 15 फेब्रुवारी रोजी अभ्यास दौरा पूर्ण करुन मायदेशात परतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती खोसकर यांनी दिली आहे.

दरम्यान आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर खोसकर हे प्रामुख्याने अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसे झाल्यास कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पत्रातून खोसकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे अजूनही संदिग्धता कायम आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये आले होते. त्यावेळालाही झालेल्या कार्यक्रमात हिरामण खोसकर उपस्थित नव्हते. कॉंग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना जाणे त्यांनी टाळले होते. त्यामुळे ते कॉंग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा आधीपासून राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता खोसकर यांनीच आपण अभ्यास दौऱ्यावरुन आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचा खुलासा केला आहे.

The post आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला 'हा' खुलासा appeared first on पुढारी.