उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास

बिबट्याचे दर्शन www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

वरखेडा येथील भुसाळ वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून वासराला फस्त केले. शेतकरी बाळासाहेब भुसाळ यांच्या घराजवळील गोठ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. जनावरांनीही हंबरडा फोडल्याने शेतमजुराने घराबाहेर धाव घेतली असता बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे दिसले. हातात काठी घेत धाव घेतल्याने बिबट्याने धूम ठोकली. प्रकाश भुसाळ यांनी वनविभागाला माहिती दिली. वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले. बिबट्यापासून सावध राहण्याबाबत त्यांनी काही सूचना केल्या. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बिबट्याची कायमच दहशत
दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागातील परमोरी, आंबेवणी, चिंचखेड, राजापूर वरखेडा आदी गावांत बिबट्याचा वावर असतो. परिसरात उसाची शेती आणि कादवा नदी असल्याने बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळाला आहे. अडीच ते तीन वर्षांपूर्वी बिबट्याने परमोरी येथे लहान मुलावर हल्ला केला होता. त्यात त्याचे निधन झाले होते.

सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने बागांमध्ये मजुरांचा राबता आहे. त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांकडे लक्ष द्यावे, शेतकऱ्यांनी आपली जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावे, रात्री शेतावर जाताना हातात काठी व बॅटरी घेऊन फिरावे. मोबाइलवर गाणे वाजवावे. – ज्ञानेश्वर वाघ, वनसंरक्षक.

हेही वाचा:

The post उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास appeared first on पुढारी.