तब्बल 36 दिवसांनंतर मनमाड, नांदगावला कांदा लिलाव सुरू

मनमाड नांदगाव कांदा लिलाव सुरु

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मनमाड आणि नांदगाव या दोन्ही बाजार समितीत सोमवारी (दि. ६) तब्बल 36 दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू झाले. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १५५० ते १६०० रुपये भाव मिळाला. 

हमाली, तोलाई कपाती वरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन 30 मार्चपासून एका प्रकारे अघोषित संप सुरू केला होता. एकीकडे लिलाव ठप्प, तर दुसरीकडे तापमानात वाढ हाेत असल्याने चाळीत साठवून ठेवल्याला कांद्याही खराब होऊ लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे हा कांदा कुठे विकावा या विवंचनेत शेतकरी होते. शिवाय बाजार समितीचे सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर शेकडो मजूर काम करतात. लिलाव बंदचा फटका त्यांनाही बसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय पाहून सभापती दीपक गोगड यांच्यासह संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्याची बैठक घेतली. त्यात तातडीने लिलाव सुरू करा, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू. शिवाय बाजार समितीकडून तुम्हाला देण्यात आलेल्या सुविधा काढून घेण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी सोमवारपासून लिलाव सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी.या ना त्या कारणाने बाजार समितीत लिलाव बंद ठेवून आम्हाला वेठीस का धरले जाते असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा-