दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; काल रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चेंडूच्या आकाराच्या गारांचा मारा या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत. निफाड तालुक्यातील निफाड तसेच सुकेणे पिंपळस, निफाड कारखाना, रवळस, पिंपरी, कुंदेवाडी, कोठुरे, कुरडगाव, जळगाव, उगाव, शिवडी, शिवरे, सोनेवाडी, कोळवाडी या संपूर्ण परिसरातील हजारो एकर शेतीला निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसलेला आहे. प्रचंड मेहनत करून आणि पाण्यासारखा पैसा ओतून उभी केलेली द्राक्ष बागेसारखी महागडी पिके क्षणार्धात नष्ट झाली आहे. वादळामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली असून ठीक ठिकाणी रहदारीला अडथळे निर्माण झालेले होते.

निफाड येथील शेतकरी संजय सुकदेव गोळे यांनी आपल्या द्राक्ष बागेची परिस्थिती कथन करताना सांगितले की, वर्षभराची मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली. आमच्या घराचे पूर्ण उत्पन्न फक्त द्राक्ष बागेवर आणि गहू कांदा या पिकांवर अवलंबून होते. मात्र जेमतेम दहा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. आयुष्यात कधी पाहिले नव्हता. एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते.

परिसरातील संपूर्ण द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने क्षणात हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणे सुद्धा अशक्य होऊन बसलेले आहे. या गारपिटीबरोबर तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून जेमतेम महिनाभराची कोवळी असलेली गहू, कांदा व हरभरा यांची रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. टोमॅटो, वांगे, ऊस भाजीपाल्याला सर्व पिकांना प्रचंड फटका बसला आहे. अनेक शेतांमधून दोन-दोन फूट उंचीचे पाण्याचे लोंढे वाहिले. त्यामुळे पिकांबरोबरच महागडी खते वाहून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बनकर यांचे निवेदन

आमदार दिलीप बनकर यांनी देखील तातडीने एक निवेदन प्रसिद्ध केले असून आपण या नैसर्गिक आपत्तीची माहिती सर्व संबधित शासकीय अधिकाऱ्यांना दिली असून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांनी धीर धरावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा :

The post दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी appeared first on पुढारी.