नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?

missing

नाशिक : गौरव अहिरे

कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, प्रेमप्रकरण या समस्यांमुळे सज्ञान व्यक्ती घर सोडून जात असल्याचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षात अठरा वर्षांवरील एक हजार ४१५ नागरिक नातलगांना पूर्वकल्पना न देताच घर सोडून गेले होते. तर चालू वर्षात एक हजार ७४१ नागरिकांनी घर सोडले आहे. म्हणजेच सरासरी दिवसाला पाच व्यक्ती घर सोडून जात असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे नाराजी, नैराश्यात वाढ झाल्याने अनेक जण मूळ प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश नागरिक घरी परतले असून, काही जण अद्याप बेपत्ता आहेत.

शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून एक जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत १८ वर्षावरील वयोगटातील एक हजार ७४१ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. पोलिसांच्या तपासात बहुतांश नागरिक काही दिवसांनी घरी परतले आहेत. तर काहींनी आत्महत्या केली, काहींचा खून झाला तर काहींचा अद्याप तपास लागलेला नाही. पोलिस तपासात घर सोडून जाणाऱ्यांमध्ये नाराजी किंवा नैराश्य असल्याचे आढळून आले आहे. आर्थिक संकट, कौटुंबिक समस्या, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता, प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, मानसिक आजारपण यामुळे नागरिक घर सोडून जात असल्याचे आढळून आले आहे. त्यात १८ ते ४० वयोगटातील पुरुषांचे सर्वाधिक प्रमाण आहे. घरातील कोणालाही पूर्वकल्पना न देता निघून गेल्यानंतर २४ तास प्रतीक्षा केल्यानंतर नातलग पोलिसांकडे तक्रार करत असतात. अनेकदा तक्रार केल्यानंतर बेपत्ता व्यक्ती पुन्हा घरी परतलेला असतो. मात्र अनेकदा नातलगांकडून याची माहिती पोलिसांना कळवली जात नसल्याचेही आढळून आले आहे.

पोलिस ठाणेनिहाय बेपत्ता नागरिक

पोलिस ठाणे- २०२२-२०२१

आडगाव ९४ -८६

म्हसरूळ ८६ -८३

पंचवटी १६५ -१४४

भद्रकाली ७१-६९

मुंबईनाका १०६ -७४

सरकारवाडा ६४ -५४

गंगापूर ७५ -९३

सातपूर १५३ -८४

अंबड ३२८ -२३४

इंदिरानगर १४८ -१४५

उपनगर १६८ -१२६

नाशिकरोड २२४-१७२

देवळाली कॅम्प ५९ -५१

बेपत्तांचा घातपात

शहरातील काही प्रकरणांमध्ये घरातून निघून गेलेल्या व्यक्तींचा घातपात झाल्याचेही आढळून आले आहे. त्यातील काहींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, तर काहींचे अपहरण, खून झाल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे बेपत्ताची तक्रार आल्यानंतर पोलिस शोधमोहिमेवर भर देत असतात.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे? appeared first on पुढारी.