नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री केवल पार्क व सद्गुरूनगर भागात झालेल्या दोन घरफोड्यांत २७ तोळे सोने आणि एक किलो चांदी तसेच रोख रकमेवर डल्ला मारला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम शर्मा (वय ५९) यांच्या मालकीचा केवल पार्क रोडवर गुरुकृपा बंगला आहे. शनिवारी ते मुंबईला नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याने रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याच्या बांगड्या, चेन, अंगठी, मंगळसूत्र असे २५ ते २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच एक किलो वजनाचे चांदीचे विविध दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास शर्मा यांच्या घरात काम करणारी महिला आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तिने शर्मा यांना हा प्रकार कळविला असता ते मुंबईहून नाशिकला दाखल झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक नझम, पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख आदी दाखल झाले. घरफोडी करणारे चोरटे हे कारमधून आल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे.

दुसरी घरफोडी सद्गुरूनगर भागात झाली आहे. सद्गुरूनगर सोसायटीतील राजेश येवला हे शनिवारी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या फ्लॅटला कुलूप होते. चोरट्यांनी शनिवारी रात्री कुलूप तोडून कपाटातील रोख ८५ हजार रुपये आणि दीड तोळे सोन्याचे दागिन चोरून नेले. रविवारी सकाळी घरफोडी झाल्याचे लक्षात आले. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ तपास करत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास appeared first on पुढारी.