नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्या www.pudhari.com

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे जावई इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (रा. अंबरनाथ, मुंबई) हे आपल्या सासरवाडीत सासऱ्यांची शेती कसत होते. सासरे निवृत्ती बाबुराव जाधव यांनी आपल्या मृत्युपत्रात सदरची सर्व शेती आपली मुलगी व इंद्रजीत विश्वजित जाधव यांच्या पत्नी सोनाली इंद्रजीत जाधव यांच्या नावावर केली होती. तेव्हापासून  इंद्रजीत चव्हाण हेच शिरसगाव लौकि येथील शेती सांभाळत होते. त्यांनी आपल्या शेतीमध्ये टोमॅटो, मका, कांदे अशी नगदी पिकं घेतली होती.

शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या विवंचनेतून त्यांनी घराशेजारी असलेल्या कांदा चाळीत अँगलला गळफास घेऊन इंद्रजीत चव्हाण यांनी आत्महत्या केली.

या घटनेची नोंद येवला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून  करण्यात आली.  तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलीस करीत आहेत.

 

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.