नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

चार्जिंग स्टेशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील सहाही विभागांत उभारल्या जाणाऱ्या १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठीची जागा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यास सात नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) निविदा प्रक्रियेची मुदत संपुष्टात आली आहे. आता वीस कंपन्यांमध्ये रस्सीखेच असून, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार याबाबतची उत्सुकता आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण प्रभावीपणे राबविताना चार्जिंग स्टेशनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशात दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार महापालिकेकडून शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, निविदेसाठी यापूर्वी २ मेची मुदत देण्यात आली होती. मात्र, महापालिकेडून १७ मेपर्यंत त्यास मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली गेली. दरम्यान, ज्या सात कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे, त्या कंपन्यांचे सर्व कागदपत्रे व इतर तांत्रिक बाजू तपासली जाणार आहे. सर्व पडताळणी केल्यानंतर कंपन्यांना चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम दिले जाणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या कागदपत्रांच्या तपासणीबरोबरच इतर बाबींच्या पडताळणीचे काम सुरू असून, लवकरच निवडक कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारल्यास शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्यास मदत होईल. या वाहनांमुळे प्रदूषणमुक्तीसह पर्यावरण संवर्धनासाठी मोठा उपयोग होणार आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. विद्युत, बांधकाम आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर विविध कंपन्यांकडून चार्जिंग स्टेशनसाठी निविदा मागवण्यात येत आहेत. टाटा पॉवरसह इतर काही कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे समजते आहे. पहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशन होताच पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील स्टेशनच्या कामांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

शहरात सर्वत्र चार्जिंग स्टेशन

शहरातील पंचवटी अमृतधाम येथील फायर स्टेशन, सातपूर येथील राजे संभाजी स्टेडियम, नवीन नाशिक येथील कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, नाशिक पश्चिम येथील बी. डी. भालेकर शाळेमागील पार्किंग, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजीबाजार इमारत मनपा खुली जागा, लेखानगर मनपा मैदान, अंबड लिंकरोड आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.

‘प्रीबिड’मध्ये १६ कंपन्या

चार्जिंग स्टेशनसाठी प्रीबिड मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १६ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभागी कंपन्यांकडून काही सूचनाही करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नसल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.