नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

बुडून मृत्यू,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

चेहेडी येथील दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नर फाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडून बुडाले आहेत. अग्निशमन दलाकडून दिवसभर शोधकार्य सुरू होते. यातील सिद्धार्थ शंकर गांगुर्डे याचा मृतदेह मिळाला असून, दुसऱ्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरू असून, नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आले आहेत. शनिवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास अंघोळीसाठी सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहुल दीपक महानुभाव (१८), संतोष नामदेव मुकणे व आर्यन नंदू जगताप बंधाऱ्यावर आले होते. त्यातील दोघांनी बंधाऱ्यावरून पाण्याच्या प्रवाहात पूर्व दिशेला पाण्यात उड्या मारून नदीकिनारी आले. परंतु सिद्धार्थ गांगुर्डे व राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्कील झाले. त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली. परंतु त्यांना ती मिळू शकली नाही. ते बुडाल्याचे तब्बल दोन-तीन तासांनी संतोष मुकणे याने त्यांच्या घरी येऊन सांगितले. घरच्यांनी त्वरित अग्निशमन दलास कळवताच अग्निशमन दलाचे रामदास काळे, राजेंद्र आहिरे, उमेश गोडसे, शिवाजी खुळगे, अशोक निलमणी, बाजीराव कापसे, राजेंद्र खर्जुल, तानाजी भास्कर यांनी शोधमोहीम सुरू केली. यातील सिद्धार्थ शंकर गांगुर्डे याचा मृतदेह मिळाला असून, दुसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

हेही वाचा :

The post नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.