नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

आशिष शेलार, जरीफ बाबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अफगाणिस्तानचे निर्वासित व सुफी धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा सैयद जरीफ चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे, त्याचप्रमाणे बाबांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते व आ. आशिष शेलार यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे.

मालमत्तेच्या वादातून जरीफ बाबा यांचा त्यांचे सेवेकरी व जुन्या वाहनचालकाने संगनमत करून इतरांच्या मदतीने खून केल्याची घटना 5 जुलैला येवला येथील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, दोघे संशयित फरार आहेत. संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक नेमावे, अशी मागणी आ. शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानातील निर्वासित असताना जरीफ बाबा यांच्याकडे इतकी बेहिशेबी मालमत्ता कोठून आली. बाबांना केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कसे मिळाले. त्यातून त्यांनी सेवेकर्‍यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. या मुद्यांकडे आ. शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

या प्रकरणी पोलिस महासंचालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. जरीफ बाबांच्या नातलगांना व्हिसा मिळण्यास अडचणी येत असल्याने ते भारतात येऊ शकत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह अफगाणिस्तानात पाठविण्याबाबत दूतावासाकडे चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या पत्नी तरिना यांनीदेखील पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी अफगाणिस्तानात परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही समजते. येत्या काही दिवसांत भारतातच जरीफ बाबा यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेलार यांनी उपस्थित केलेले मुद्दे
बाबा किती पैसे कमवायचे व ते कसे खर्च केले?
पैशातून बेनामी मालमत्ता खरेदी झाली का?
धार्मिक विधीसाठी इतका पैसा कोण द्यायचे?
मनी लाँड्रिंगची शक्यता आहे का?
राष्ट्रविरोधी कामासाठी पैसा प्रवाहित झाला का?

हेही वाचा :

The post नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा - आ. आशिष शेलार appeared first on पुढारी.