नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

प्रदीप मिश्रा,www.pudhari.news

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा-आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथेला मंगळवारी (दि. २१) प्रारंभ होत आहे. शनिवार (दि. २५) पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत भवानी माथा, सब स्टेशनजवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, पाथर्डी, जाधव पेट्रोलपंपासमोर नाशिक येथे भाविकांना कथा ऐकण्यास मिळेल. (Shiv Mahapuran Katha Nashik)

कथा नियोजनाची तयारी पूर्ण झाली असून, बाहेरगावचे सुमारे आठ ते दहा हजार भाविक सोमवार (दि. 20) पासूनच मंडपात मुक्कामी आहेत. या कथेप्रसंगी सुमारे ५५० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा सोमवारी सायंकाळी घेतला. यावेळी आविष्कार भुसे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, श्यामकुमार साबळे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, सोमनाथ बोराडे, अमोल जाधव आदी सोबत होते. भुसे यांनी या ठिकाणी उभारलेल्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्याच दिवशी पाच लाखांहून अधिक गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंडप वाढवायचा किंवा नाही त्या दृष्टीनेही चर्चा झाली. स्वयंसेवकांना समिती प्रमुखांकडून जबाबदाऱ्यांचे वाटप झाले. (Shiv Mahapuran Katha Nashik)

पाथर्डी फाटा तसेच इंदिरानगर भागातील मुख्य रस्त्यांवर सोमवारी सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होते. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पोलिसांची आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. पाथर्डी फाटा ते कार्यक्रम स्थळापर्यंत संपूर्ण परिसरात फलक लावल्याने संपूर्ण परिसर कथामय झाला आहे. मुक्कामी भाविकांनी भजन सादर करून परिसर भक्तिमय केला आहे. (Shiv Mahapuran Katha Nashik)

परिसरात पोलिस चौकी उभारली

परिसरात पोलिस चौकी उभारली आहे, यासाठी पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली ११ पोलिस निरीक्षक, ३० सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी ३२५ व वाहतूक शाखेच्या २० अधिकाऱ्यांसह सुमारे २०० कर्मचारी तैनात केले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा appeared first on पुढारी.