वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

शहराचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षगणना आवश्यक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या वृक्षगणनेचा (tree census) वाद अद्याप कायम असताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत नव्याने वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता वृक्षप्राधिकरणाचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले असून, त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी टेरेकॉन इकोटेक प्रा.लि.मंबई या मक्तेदार संस्थेला शहरातील वृक्षगणनेचे काम दिले होते. शहरात सुमारे २५ लाख झाडे असतील, असा अंदाज गृहीत धरून या वृक्षगणनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी ८.५० पैसे प्रतिवृक्ष याप्रमाणे दोन कोटी १३ लाख ७५ हजार रुपये अदा केले जाणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे निविदा अंतिम झाल्यानंतर वृक्षगणना सुरू झाली. मात्र वृक्षगणनेअंती शहरात ४९ लाख वृक्ष असल्याची आकडेवारी मक्तेदाराकडून सादर करण्यात आली. वास्तविक पाहता प्रशासकीय मंजुरीपेक्षा अधिक खर्चाच्या वृक्षगणनेसाठी महासभेची फेरमंजुरी घेतली जाणे आवश्यक असताना त्यास फाटा देत ही वृक्षगणना पूर्ण केली गेली. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस अकादमी व लष्करी हद्दीतील वृक्षगणना संरक्षणाच्या मुद्द्यावरून करण्यात आली नव्हती.

मक्तेदाराला १.९० कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यासाठी मागच्या दाराने प्रस्ताव मंजुरीचे प्रयत्न झाले. परंतु, त्यास विरोध झाल्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने देखील ही निविदा अटी-शर्तीनुसार संबंधित मक्तेदाराला अतिरिक्त देयक अदा करणे योग्य नसल्याचा निकाल दिला आहे. त्यानंतरही संबंधित मक्तेदाराला देयक अदा करण्याचे प्रयत्न सुरूच होते. हा वाद अद्यापही कायम असताना वृक्षप्राधिकरणाच्या अंदाजपत्रकात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे वृक्षगणना वादात (tree census) 
२०१६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेत आढळलेल्या एकूण ४९ लाख झाडांपैकी निम्मी अर्थात २४ लाख झाडे गिरीपुष्प या प्रजातीची असल्याचे सर्वेक्षणात दर्शविण्यात आले होते. महापालिका हद्दीत गिरीपुष्प प्रजातीची बहुतांश झाडे ही वनविभागाच्या जागांवर आहेत. वनविभागाकडील जागांचे क्षेत्र हे निर्धारित आहे. त्या संपूर्ण क्षेत्रावर गिरीपुष्पाची लागवड केली तरी ती सात ते दहा लाखांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. असे असताना २४ लाख गिरीपुष्पांचा आकडा वृक्षगणनेत आलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाल्याने वादाला तोंड फुटले होते.

नवीन वृक्षलागवडीसाठी पाच कोटी
वृक्षप्राधिकरणाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन वृक्षगणनेसाठी (tree census) पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धनाच्या जुन्या कामांकरिता २.४० कोटी, नवीन वृक्षसंरक्षक जाळ्यांसाठी ६० लाख, जुने वृक्षसंरक्षक दुरुस्तीसाठी २० लाख, खत, माती खरेदीसाठी पाच लाख, नर्सरी बाबींकरिता पाच लाख, नर्सरी सुधारणेकरिता ५१ लाख, रोपे खरेदीसाठी पाच लाख, कुंड्या खरेदीसाठी १० लाख, वृक्षप्राधिकरण वाहन खरेदीसाठी ९० लाख, पुष्पोत्सवासाठी ४५ लाख, तसेच वृक्ष पुनर्रोपणासाठी ५० लाखांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर appeared first on पुढारी.