सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; तपासणी मोहीम सुरु

Hospital pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर रुग्ण हक्क सनद तसेच रुग्णसेवेचे दर दर्शनी भागात लावण्यासाठी खासगी रुग्णालयांची धावपळ सुरू झाली आहे. रुग्णांची आर्थिक लूट टाळण्यासाठी सनद तसेच दरपत्रक दर्शनी भागात लावले गेले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जात आहे.

कोरोना काळात रुग्ण व नातेवाइकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य शासनाने रुग्णालयांना रुग्ण हक्क सनद व रुग्णसेवेचे दरपत्रक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले होते. शासन निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी महापालिकेने मोहीम सुरू केली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून नियमाची अंमलबजावणी झाली. कोरोनानंतर मात्र संहिता व रुग्णसेवेचे दरपत्रक गायब झाल्याने महापालिकेकडे तक्रारी आल्या. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने यासंदर्भात तीन वेळा संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावली. मात्र त्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने नऊ निकषांच्या आधारे खासगी रुग्णालयांच्या तपासणीचा निर्णय घेतला. कारवाईच्या धसक्याने महापालिका हद्दीतील सुमारे 650 रुग्णालयापैकी बहुतांश रुग्णालय प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू झाली. परंतु अद्यापही पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही, तर काही ठिकाणी दिसणार नाही अशा पद्धतीने सनद लावल्याच्या तक्रारीदेखील आल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून रुग्णालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टनुसार (Maharashtra Nursing Home Act) रुग्ण हक्क दरपत्रक न लावणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात तक्रार करण्यासाठी १८००२३४२४९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बहुतांश खासगी रुग्णालयांकडून सनद व दरपत्रक लावण्याची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी अद्यापही काही रुग्णालयांबाबत तक्रारी असल्याने वैद्यकीय पथकांमार्फत संबंधित रुग्णालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. – डॉ. प्रशांत शेट्ये, सहायक वैद्यकीय अधिकारी, मनपा.

हेही वाचा:

The post सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; तपासणी मोहीम सुरु appeared first on पुढारी.